“…त्यांची स्वतःची कारणे” ; राहुल गांधींच्या ‘डेड इकॉनमी’ वरील विधानावर शशी थरूर यांचे स्पष्टीकरण

Shashi Tharoor on Rahul Gandhi। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डेड इकॉनमी’वरील विधानाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दिल्याने नवा वाद निर्माण झाला होता. आता त्यांच्या विधानावर शशी थरूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी “भारताचे अमेरिकेशी चांगले व्यापारी संबंध आहेत आणि त्याच्यावर कोणताही परिणाम होऊ नये” असे म्हटले आहे. त्यासोबतच राहुल गांधींचा उल्लेख करताना थरूर यांनी, “मी माझ्या पक्षाच्या नेत्याच्या विधानावर भाष्य करू इच्छित नाही. कारण असं विधान करण्याची त्यांची स्वतःची कारणे आहेत.” असे म्हणत त्यांच्या वक्तव्यावर बोलणे टाळले.
सर्वात मोठी चिंता ‘ही’ आहे – थरूर Shashi Tharoor on Rahul Gandhi।
तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर बोलताना, “माझी चिंता ही आहे की अमेरिकेशी असलेले आपले संबंध धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. भारताने अमेरिकेशी असलेले आपले मजबूत व्यापारी संबंध जपले पाहिजेत.” असे त्यांनी जोर देऊन सांगितले. त्यासोबतच पुढे बोलताना,”अमेरिका ही देशातील सर्वात मोठ्या निर्यात बाजारपेठांपैकी एक आहे, जिथे दरवर्षी सुमारे ९० अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू जातात” असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिका ही आपल्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी, “आपण अमेरिकेला सुमारे $90 अब्ज किमतीच्या वस्तू निर्यात करत आहोत. त्यामुळे आपण अशा परिस्थितीत नाही आहोत जिथे आपण त्या वस्तू गमावू शकतो किंवा त्यात मोठी घट होऊ शकते. काही लोक म्हणतात की ते आपल्या GDP च्या फक्त 2 टक्के आहे, परंतु आपल्या निर्यातीच्या बाबतीत अमेरिका ही आपल्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे.”असेही यावेळी सांगितले.
‘आपण इतर देशांशीही बोलले पाहिजे’ Shashi Tharoor on Rahul Gandhi।
त्यासोबतच थरूर यांनी “आपल्या वस्तूंच्या निर्यातीसाठी आपण इतर देशांशीही बोलले पाहिजे. मग आपण अमेरिकेत होणाऱ्या काही नुकसानाची भरपाई करू शकू.” असे म्हटले. भारतातून आयातीवर 25 टक्के कर लावण्याची घोषणा केल्यानंतर ट्रम्प म्हणाले, “भारत आणि रशिया एकत्रितपणे त्यांच्या मृत अर्थव्यवस्थेला डबघाईला नेऊ शकतात. भारत रशियावर काय करतो याची मला पर्वा नाही.”असे म्हटले होते.
त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत ट्रम्प यांच्या विधानाचे समर्थन केले, त्यानंतर देशात राजकारण तापले. राहुल गांधी यांनी, “ट्रम्प बरोबर आहेत. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांशिवाय सर्वांना हे माहित आहे.”असे म्हटले.





