Stock Market : ‘या’ कारणामुळे शेअर बाजारात पुन्हा आपटला, सेन्सेक्स ७४,७८१.७६ अंकांवर बंद
Stock Market : शेअर बाजारात शुक्रवारी सेन्सेक्स १२०.८३ अंकांनी तर निफ्टी ७९.७० अंकांनी घसरला. कच्च्या तेलाच्या दरात घट झाली, तर HDFC Bank आणि IT शेअर्समध्ये खरेदी झाली.

Stock Market : कच्च्या तेलाच्या दरात घसरण आणि एचडीएफसी बँक तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील काही शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे शुक्रवारी शेअर बाजाराने दिवसभरातील मोठी घसरण काही प्रमाणात भरून काढली. मात्र, व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२०.८३ अंकांनी (०.१६ टक्के) घसरून ७४,७८१.७६ अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो ७४२.४३ अंकांनी घसरून ७४,१६०.१६ अंकांपर्यंत खाली आला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७९.७० अंकांनी (०.३४ टक्के) घसरून २३,३९८.१० अंकांवर स्थिरावला. व्यवहारादरम्यान निफ्टीमध्ये २४६.४ अंकांची घसरण होऊन तो २३,२३१.४० अंकांपर्यंत खाली गेला होता.
सेन्सेक्समधील टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, बजाज फायनान्स, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, लार्सन अँड टुब्रो आणि ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये प्रामुख्याने घसरण झाली. दुसरीकडे, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इटरनल आणि इन्फोसिस यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली. ब्रेंट क्रूडचा दर ३.१९ टक्क्यांनी घसरून १०४.२० डॉलर प्रति बॅरलवर आला.
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, युरोपीय बाजारातील सकारात्मक सुरुवात आणि काही क्षेत्रांमध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराने दिवसातील नीचांकी पातळीवरून काहीशी सुधारणा केली. मात्र, बाजारातील एकूण सहभाग कमी असल्याने बाजारात अजूनही अस्थिरता कायम आहे.
कच्च्या तेलाचे चढे दर, परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री आणि भू-राजकीय अनिश्चितता यामुळे बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, देशांतर्गत अर्थव्यवस्थेची स्थिती आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचा पाठिंबा यामुळे बाजाराला खालच्या पातळीवर आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई २२५, शांघायचा एसएसई निर्देशांक आणि हाँगकाँगचा हँगसेंग घसरणीसह बंद झाले. युरोपीय बाजार मात्र तेजीत व्यवहार करत होते. अमेरिकेतील बाजार गुरुवारी घसरणीसह बंद झाले.
गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४३८.२४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराच्या आकडेवारीतून समोर आली.
गुरुवारी सेन्सेक्स १३८.३६ अंकांनी वाढून ७४,९०२.५९ अंकांवर, तर निफ्टी ४६.३० अंकांनी वाढून २३,४७७.८० अंकांवर बंद झाला होता.





