Share Market Scam – वाकड परिसरातील रहिवाशाला बनावट सीएमसी कंपनीच्या नावाखाली शेअर मार्केटमधील ईटीएफ गुंतवणुकीचे आमिष दाखवत १.५१ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १ नोव्हेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे. मेघना चव्हाण (व्हॉट्सअॅप क्रमांक नमूद), तसेच संबंधित टेलीग्राम आयडीधारक आणि https://m.cmcnavanv.cc या लिंकचे संचालक यांच्यासह विविध बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वेस्टर्न अव्हेन्यू, वाकड येथील एका पुरुषाने शुक्रवारी (दि. १३) याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट सीएमसी कंपनीचे संकेतस्थळ वापरून शेअर मार्केटमध्ये ईटीएफ गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीकडून तब्बल एक कोटी ५१ लाख आठ हजार ५३० रुपये गुंतवून घेतले. त्यानंतर खात्यात १ कोटी रुपयांचा आभासी नफा दाखवून तो काढण्यासाठी आणखी ५३ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात गुंतवलेली रक्कम आणि कथित नफा परत न देता आरोपींनी संपर्क तोडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करीत आहेत.