शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाचा लौकिक; गुजरात प्रतिनिधी मंडळाकडून शाबासकी

माळेगाव – गुजरात सरकारच्या नॉलेज कन्सोर्टियम अंतर्गत आयोजित लर्निंग अँड एक्सपोजर कम स्टडी टूरच्या निमित्ताने, गुजरातमधील तीन शासकीय महाविद्यालयांच्या प्राचार्यांसह प्रतिनिधी मंडळाने दिनांक ८ व ९ सप्टेंबर रोजी बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाला भेट दिली. या दौऱ्याचा उद्देश महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन कार्य, आणि सामाजिक उपक्रमांचा सखोल अभ्यास करणे हा होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. व्ही. महामुनी यांनी ढोल पथकाच्या स्वागताने पाहुण्यांचे मन जिंकले आणि महाविद्यालयाच्या विविध कार्यांची सादरीकरणाद्वारे प्रभावी माहिती दिली. प्रतिनिधी मंडळाने कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान आणि संगणक शास्त्र विभागांची सविस्तर पाहणी केली. अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय आणि आधुनिक क्रीडांगण यांची गुणवत्ता विशेषतः कौतुकास्पद ठरली.
अभ्यास आणि संवादाचा समृद्ध अनुभव
प्रतिनिधींनी विविध विभागांना भेट देऊन संबंधित प्राध्यापकांशी संवाद साधला. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, गणित, इंग्लिश, मानसशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र इत्यादी विभागांतील कार्यपद्धती आणि नवकल्पना यांचा अभ्यास केला. महाविद्यालयाने राबवलेले स्वयंसिद्धा युवती संमेलन, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, आणि करिअर कट्टा यांसारखे उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरले.
या भेटीदरम्यान, शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने गुजरातच्या तीन शासकीय महाविद्यालयांसोबत शैक्षणिक देवाणघेवाण, संशोधन आणि विस्तार कार्यासाठी सामंजस्य करार (MOU) केला. या करारावर प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी आणि प्रा. राजकुमार देशमुख यांनी स्वाक्षरी केली.
संस्कृती, क्रीडा आणि सहकार्याचा संगम
आंतरराष्ट्रीय खेळाडू रेश्मा पुणेकर आणि किरण नवगिरे यांच्या यशाची माहिती मिळाल्यावर शिष्टमंडळाने विशेष कौतुक केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन आणि आयोजन यामध्ये महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट योगदान दिले.
प्राचार्य डॉ. नयनकुमार सोनारा आणि डॉ. आर. बी. जोशी यांनी ही भेट माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि फलदायी ठरल्याचे सांगून भविष्यातील शैक्षणिक सहकार्य वाढवण्याची आशा व्यक्त केली.





