Satara | मांढरगडावर शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात

मांढरदेव, (प्रतिनिधी) – मांढरगडावर शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात झाली असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या काळुबाई देवीची आज घटस्थापना करण्यात आली.
नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याकारणाने मंदिर पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
सकाळी शास्त्रीय पद्धतीने काळुबाई देवीची पूजा पुजारयामार्फत झाली. यानंतर गावातील भैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मंदिरातील घटस्थापना केल्यानंतर सर्व ग्रामस्थ काळेश्वरी देवीच्या मंदिरात आले.
येथे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने ग्रामस्थ व सर्व भाविक यांच्या उपस्थितीमध्ये देवीचे पुजारी शास्त्रोक्त पारंपारिक पद्धतीने काळेश्वरी देवीची घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर देवीची महाआरती झाली.
यानंतर देवीचे शिपाई असलेले मांगीर बाबा, गोंजीर बाबा यांच्या मंदिरात घटस्थापना करुंद देवीला नैवेद्य दाखण्यात आला. देवस्थान ट्रस्टमार्फत देवीला आलेल्या सर्व भक्तांना राजगिराचे लाडू व खिचडीचे वाटप करण्यात आले.
मांढरगडावर शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात झाली असून नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याकारणाने मंदिर पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
देवीच्या सर्व भक्तांना दर्शन सुलभ व लवकर व्हावे म्हणून देवस्थान ट्रस्टमार्फत तात्काळ दर्शनाची देखील सुविधा करण्यात आलेली आहे. या नऊ दिवसाच्या काळामध्ये मांढरगडावर भक्तिमय, आनंदी, उत्साही वातावरण रहावे यासाठी देवस्थान ट्रस्ट मार्फत भजन,गायन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ट्रस्टमार्फत भाविकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले असल्याचे देवस्थान ट्रस्ट स्थानिक विश्वस्त विजय मांढरे, चंद्रकांत मांढरे, सुनील मांढरे, ओंकार क्षीरसागर आणि सुधाकर क्षीरसागर यांच्याकडून सांगण्यात आले.





