Sharad Pawar Speech : शरद पवारांचा घणाघात अन् हशांनी भरलेला सभागृह; निलेश लंकेवर स्तुतिसुमने

पुणे : “तुम्ही कोणी कधी निलेश लंके यांच्या घरी गेलात का?” असा मिश्कील प्रश्न शरद पवार यांनी विचारताच सभागृहात हास्याचं वातावरण पसरलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पक्षातील फुटीची चिंता न करता निष्ठावान कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं.
“लंके यांचं घर एका खोलीचं आहे. पण ते तिथे रात्री दोन-तीन वाजेपर्यंत लोकांची कामं करत असतात. अशा कार्यकर्त्यांमुळेच पक्ष उभा राहतो,” असे म्हणत त्यांनी निलेश लंके यांचं कौतुक केलं.
शरद पवार पुढे म्हणाले, “तुमच्यासारखे कार्यकर्ते एकत्र राहिले, तर सत्ता आपोआप येईल. महाराष्ट्रात सत्तेचं चित्र बदलताना दिसत आहे.” त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना एकीचं आणि बांधिलकीचं महत्व अधोरेखित करत नवा आत्मविश्वास दिला.
मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा : जयंत पाटील
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि सध्या प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी “मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा” अशी स्पष्ट आणि थेट मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. यामुळे पक्षात नेतृत्वाच्या पातळीवर मोठ्या बदलाची शक्यता व्यक्त होत आहे.
जयंत पाटील म्हणाले, “ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे आणि आम्ही तुकारामांच्या बाजूने आहोत.” त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही जोरदार हल्ला चढवला. “शिवभोजन थाळी बंद झाली, अनाथांसाठीचे पैसे वळवले जात आहेत, महापालिकांवर प्रशासक बसवले जात आहेत, निवडणुका टाळल्या जात आहेत,” अशी ताशेरेबाजी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.





