“शरद पवारांनी ते जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून वदवून घेतलं…’; संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य

Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, तो 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य आव्हाड यांनी शिर्डीमध्ये केले यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या विधानानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेत्यांनीही त्यांच्या या विधानानंतर संताप व्यक्त केला आहे.
अश्यातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी वेगळाच सूर लावला. “जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याला सरळ अर्थाने घेऊ नका. शरद पवार यांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड व्यासपीठावर बोलतात. तेव्हा ती शरद पवारांची भूमिका असते. शरद पवारांनी ते जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून वदवून घेतले असावे..’ असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर ते चुकीचे बोलले, असे शरद पवार कुठेही म्हणाले नाहीत. याचा अर्थच त्यांची याला मूकसंमती आहे. आपल्यातलेच लोक आपल्या देवावर असे विधान करतात, हे वाईट आहे. दुसऱ्या धर्मातील दैवताबद्दल आव्हाड बोलले असते तर त्यांचे कपडे आतापर्यंत फाडले गेले असते, असाही आरोप शिरसाट यांनी केला.
‘राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता’ – जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, “आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो.
राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून संपूर्ण राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे.





