Satara News : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा. म्हेत्रे

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा. कविता म्हेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नुकताच कार्यभार स्वीकारला. त्यानंतर मुंबई येथील पदनियुक्ती कार्यक्रमात त्यांच्या हस्ते प्रा. म्हेत्रे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
प्रा. कविता म्हेत्रे यांनी म्हसवड पालिकेत विरोधी गटनेता म्हणून प्रभावी काम केले होते. पक्षाच्या तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष या पदांवर त्यांनी काम केले होते. त्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदावर होत्या. ‘मी सावित्री ज्योतिराव फुले बोलतेय’ आणि ‘मी अहिल्यादेवी होळकर बोलतेय’ हे एकपात्री प्रयोग आणि व्याखानांमुळे राज्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावरून जनतेचे व महिलांचे प्रश्न सोडवण्यात त्या अग्रेसर असतात.
या महत्त्वाच्या पदाबद्दल प्रा. म्हेत्रे यांनी शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, रोहित पवार यांचे आभार मानले. पक्षाच्या ज्येष्ठ आणि प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येयधोरणे, कार्यक्रम, शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आणि पक्षवाढीसाठी काम करण्याचा निर्धारही प्रा. म्हेत्रे यांनी व्यक्त केला.

