Sharad Pawar : “ते म्हणाले शरद पवार को क्या समझता है, लोकांनी…”; शरद पवारांनी कोणाला लगावला हा टोला ? वाचा सविस्तर

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरच्या माढा दौऱ्यादरम्यान कापसेवाडी गावात काल आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला राज्यातील शेतकऱ्यांची व शेती क्षेत्राची परिस्थिती यावर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच, शेती क्षेत्राच्या समस्यांवरील उपाय सांगतानाच राज्य सरकारवर सडकून टीका केली. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचाही उल्लेख खोचकपणे केला त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
शरद पवार यांनी या मेळाव्यात केलेल्या भाषणाचे शब्दांकन त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे. यामध्ये शेती क्षेत्राविषयी मांडलेली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री असताना उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीचा उल्लेख पवारांनी पोस्टमध्ये केला आहे. “सोलापूर जिल्हा हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळी पाहणी करायला इंदिरा गांधी याठिकाणी आल्या होत्या आणि कधीही न पाहिलेले एवढे मोठे संकट तेव्हा आम्ही पाहिले. ५ लाख लोक दुष्काळी भागात काम करण्यासाठी जात होते त्यांचा पगार आणि बाकीची व्यवस्था करण्यासाठी अधिकाऱ्यांना रात्रीच्या ३-३ वाजेपर्यंत बसावे लागत असत या सर्वांचा आठवड्याचा पगार काढणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यावेळी अनेक सहकारी मदतीला होते”, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुढे त्यांनी, “यावेळी आपण केंद्रात किंवा राज्यात सत्तेत कुठेच नसलो, तरी आपण सगळीकडे असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. “राज्य, केंद्र सरकारच्या संबंधित इथे अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण यापैकी मी कुठेच नाही परंतु काळजी नसावी मी कुठेच नसलो तरी सर्व ठिकाणी आहे, जी काही दुखणे असतील त्या सर्वांची नोंद मी घेतली आहे आणि यानंतर प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्यातील जे-जे काही शेतीसंबंधी प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या सोडवणुकीला राज्य व केंद्र सरकार यांच्याशी काय बोलावे आणि त्यातून तुमची सुटका कशी होईल यासंबंधी चर्चा करेन”, असे पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कापसेवाडी या गावी आयोजित शेतकरी मेळावा या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवत सर्व शेतकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन केले.
आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आणि द्राक्षाच्या पिकामध्ये ज्यांनी अतिशय कष्टाने फार मोठे काम केले ते नितिन बापू कापसे,… pic.twitter.com/9vzjiwpYU0
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 16, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यावेळी शरद पवारांनी खोचक टोला लगावला. त्यांच्याविषयी बोलताना,“देशाचे प्रधानमंत्री यांनी असा उल्लेख केला की, मला शेतीतलं काय समजतं पण हे काही नवीन नाही त्यामुळे ते जाऊ देत”, असं शरद पवार म्हणाले. “काही दिवसांपूर्वी निवडणुकीआधी अमित शहा नावाचे गृहस्थ या जिल्ह्यात आले होते तेव्हा त्यांनी असेच सांगितले की, शरद पवार को क्या समझता है? लोकांनी त्यांच्या उमेदवारांचा पराभव केला आणि सांगितलं की, त्यांना हे समजतं व नीटनेटकं समजतं. राजकारण या ठिकाणी काढायचं नाही”, असा टोला शरद पवारांनी लगावला.
शेवटी त्यांनी,“अलीकडेच एक गोष्ट ऐकायला मिळाली की, काही ठिकाणी राजकारणामध्ये त्यांच्या मनासारखं काम केलं नाही तर दबाव आणतात. दबावाने आज चांगलं काम करणाऱ्याला त्याच्या कामापासून बाजूला करायचं काम करतात. मी एवढेच सांगू इच्छितो की, जसं कर्जमाफीत कुणाला फसवणूक केली असेल किंवा प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत म्हणून दबावाचे राजकारण या ठिकाणी कुणी करत असेल तर तो दबाव सुद्धा संपवायचा कसा ? याचा विचार आम्ही करू”, असे आश्वासन शरद पवारांनी दिले





