Sharad Pawar: विखे पाटलांच्या आरोपावर शरद पवारांचे मिश्कील उत्तर; बारामतीतील पत्रकारांसमोर काय म्हणाले?
Sharad Pawar: शिवसेनेच्या चिन्ह अन् पक्षसंघर्षावर न्यायालयाचा निर्णय अंतिम; बारामतीत पत्रकार परिषदेत शरद पवारांची राजकीय मुद्द्यांवर रोखठोक भूमिका.

Sharad Pawar – मराठा समाजाचा मंडल आयोगात समावेश न करणे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ‘पाप’ असल्याची टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. या टीकेला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषदेत हसत हसत प्रत्युत्तर दिले. ‘१९९४ पासून आतापर्यंत विखे पाटील काय करत होते आणि कुठे होते?’’ असा सवाल करीत पवार यांनी या टीकेला फारसे महत्त्व नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.
बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य बारामती दौरा, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे सुरू असलेले आंदोलन तसेच शिवसेनेच्या चिन्हावरील न्यायालयीन संघर्ष आदी मुद्द्यांवर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९९४ मध्ये मराठा समाजाचा मंडल आयोगाच्या शिफारशींमध्ये समावेश केला असता,
तर आज मराठा समाजाला आरक्षणासाठी उपोषण करण्याची वेळ आली नसती. हा पवार यांचा ‘पाप’ असल्याची टीका विखे पाटील यांनी केली होती. याबाबत विचारले असता पवार यांनी हसतच प्रतिक्रिया दिली. ‘‘१९९४ पासून आजपर्यंत विखे पाटील काय करत होते?’’ अशी विचारणा करीत त्यांनी विखे पाटील यांच्या टीकेवर अप्रत्यक्षपणे पलटवार केला.
मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख निश्चित नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीला येण्याची तयारी दर्शविली असून, त्यासाठी १६ ऑक्टोबरची तारीख सुचविण्यात आली आहे. मात्र, या दौऱ्याच्या तारखेत बदल होण्याची शक्यता असल्याचे पवार यांनी सांगितले. बारामतीमध्ये उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स संस्थेची पंतप्रधान पाहणी करणार आहेत. ही देशातील पहिलीच अशी संस्था असल्याचा दावा पवार यांनी केला.
‘‘यापूर्वी सुप्रिया यांच्या मुलीच्या विवाह समारंभाच्या वेळी आमच्या काही सहकाऱ्यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण मोदी यांना केले होते. मात्र, या प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठीच हा कार्यक्रम बारामतीत आयोजित करण्यात येणार आहे,’’ असे पवार यांनी सांगितले.
शिवसेनेच्या चिन्हाबाबत न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा
शिवसेनेच्या चिन्ह आणि पक्षावरील सुरू असलेल्या संघर्षाबाबत विचारले असता पवार यांनी न्यायालयीन प्रक्रियेची प्रतीक्षा करण्याची भूमिका मांडली. ‘‘शिवसेनेच्या संघर्षाचा अंतिम निकाल काय लागेल, हे मी आत्ताच सांगू शकत नाही. याबाबतचा निर्णय न्यायालयाला घ्यायचा आहे. सध्या सुनावणी सुरू असून एका बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे.






