कराड – राज्यातील मोठ्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील प्रीतिसंमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून दर्शन घेतले. महाविकास आघाडीतील दोन्ही दिग्गज नेत्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी एकत्रितपणे उपस्थिती दर्शवत अभिवादन केल्याने राज्याच्या आगामी राजकारणासाठी हा मोठा संकेत मानला जात आहे.
येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सोमवारी पहाटेपासून शरद पवार यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. तसेच कराड शहरात ठिकठिकाणी त्यांच्या समर्थनाचे फ्लेक्स लागल्याचे दिसून आले.
यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आ. सुमनताई पाटील, आमदार रोहित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, अरुण पाटील, शिवाजीराव नाईक, सारंग पाटील, प्रभाकर देशमुख आदींची उपस्थिती होती.
प्रीतिसंगमावर राष्ट्रवादीचा मेळा
कराड येथील यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शरद पवार प्रेमींचा मेळा पाहायला मिळाला.