शरद पवार-प्रियांका गांधी यांच्या होणार एकत्रीत सभा
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर कॉंग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांनी आपली हुकूमाची पानं बाहेर काढली आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी महाराष्ट्रात 20 रॅली घेणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रियांका गांधी यांची एकत्रित प्रचारसभा होणार आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी 125-125 आणि मित्रपक्ष 38 असा आघाडीचे जागावाटप ठरले आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन दिग्गज नेत्यांची एकत्र सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रियांका गांधी आणि शरद पवार पहिल्यांदाच एका रॅलीमध्ये एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील दोन रॅलींमध्ये शरद पवार आणि प्रियांका गांधी एकत्र येणार आहेत. याशिवाय विदर्भात यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात; मराठवाड्यामध्ये दोन जिल्ह्यात, तर खानदेशात तीन ठिकाणी रॅली होणार असल्याचे समजते.
सोनिया गांधी महाराष्ट्रात 8 रॅली घेणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नंदुरबार, औरंगाबाद, बीड या ठिकाणी सोनिया गांधी सभा घेणार आहेत. तर राहुल गांधी यांची सभा विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव अशा वेगवेगळ्या पाच भागांमध्ये होणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर कॉंग्रेस रॅलीची तारीख जाहीर करणार आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्या प्रचार सभा घ्याव्यात, अशी विनंती महाराष्ट्र कॉंग्रेसकडून करण्यात आली होती.