युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवार भावूक ; म्हणाले,”माझी खात्री आहे की बारामतीची जनता..”

Sharad Pawar on Yugendra Pawar । महाविकास आघाडीने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना संधी दिली आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आज बारामती तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. शेकडो कार्यकर्ते, कुटुंबीय आणि मित्र परिवार यावेळी उपस्थित होते. सुप्रिया सुळे आणि शरद पवारही यावेळी बारामती कार्यालयात स्वतः हजर राहिले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार थोडे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
बारामतीची जनता नव्या पिढीच्या नव्या नेतृत्वाला स्वीकारेल Sharad Pawar on Yugendra Pawar ।
युगेंद्र पवार यांनी विधानसभेचा अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना “महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास देतो की मविआच्या वतीने महाराष्ट्रात जनतेच्या हिताची जपणूक करणारा, महत्त्वाचे प्रश्न बेरोजगारी, महागाई, शेतकरी, कामगार, दलित आदिवासी महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आमची आघाडी करेल, असा विश्वास मी देतो. निवडणुकीचा फॉर्म भरण्याकरता आम्ही याठिकाणी आलो आहोत. मविआच्या वतीने युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचं परदेशात उच्चशिक्षण झालंय. माझी खात्री आहे की बारामतीची जनता नव्या पिढीच्या नव्या नेतृत्वाला स्वीकारून मोठी शक्ती उभी करतील”, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.
जनतेशी बांधिलकी ठेवा
“मी स्वतः ५७ वर्षांपूर्वी बारामतीच्या तहसील कार्यालयात स्वतःचा फॉर्म भरायला आलो होतो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने जनतेने मला निवडून दिलं आहे. ५७ वर्षे एखाद्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी बनण्याची संधी दिली, त्याचं कारण जनतेशी असलेली बांधिलकी. नव्याच्या पिढीच्या सर्वच उमेदवारांना माझा सल्ला आहे की जनतेशी बांधिलकी ठेवा. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने संधी दिल्यानंतर सातत्याने जागृत राहा”, असा मोलाचा सल्लाही शरद पवारांनी तरुण उमेदवारांना दिला आहे.
काही जागांवर ९५ टक्के जागांवर एकमत Sharad Pawar on Yugendra Pawar ।
यावेळी शरद पवार यांनी, “महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा मी आढावा घेत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद दिला. त्याची नोंद अंतकरणात कायम ठेवली आहे. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्व जागा लढत आहोत. तिघांच्यात एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करतोय. एकंदर जागांपैकी ९५ टक्के जागांवर एकमत झालं आहे. काही थोड्या जागा राहिल्या आहेत, त्यावर विचार करून निर्णय घेऊ. माझी खात्री आहे की जागा वाटपाची स्पष्टता एका दोन दिवसांत होईल. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत. सरकारकडून ते सोडवले गेले नाहीत.”





