“तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप उडाली?,आम्ही अस्वस्थ…” ; शरद पवारांची खोचक टीका

Sharad Pawar on BJP । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून राज्यभरात दौरे सुरु आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. मध्यांशी बोलताना शरद पवार यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. त्यासोबतच त्यांनी काही महत्वाच्या मुद्द्यांवर मिश्किल टिप्पणी केली.
तिसऱ्या आघाडीमुळे झोप उडाली? Sharad Pawar on BJP ।
महाराष्ट्रात महाविकास आघाडी, महायुती यांच्याबरोबरच आता तिसरी आघाडीही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. यामध्ये संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी व बच्चू कडू यांचा समावेश आहे. यासंदर्भात शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत मिश्किल टिप्पणी केली. “कधीही जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा परिणाम होणारच. त्यामुळे संभाजीराजे वगैरे एकत्र आल्यामुळे नक्कीच परिणाम होणार आहेत. तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप उडाली आहे, आम्ही फार अस्वस्थ झालोय, आता यापुढे आमचं कसं होणार असा मोठा प्रश्न आम्हाला पडलाय असे म्हणत त्यांनी खोचक टीका केली.
आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरून टिप्पणी Sharad Pawar on BJP ।
यावेळी शरद पवार यांनी मविआच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवाराविषयी भाष्य करताना एक म्हण ऐकवली. “एक म्हण आहे. मी हे जातीय बोलतोय असं समजू नका. बाजारात तुरी, भट भटणीला मारी. कशाचा काही पत्ता नाही, आजच त्याची चर्चा. अजून निवडणुका व्हायच्या आहेत. सरकार बनवायचं तर त्यासाठी बहुमत पाहिजे. बहुमत मिळालं तर नेता निवडतील. नेता निवडला तर मुख्यमंत्री होईल. जयंत पाटील कधी असं बोलतात का? त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे”, असे स्पष्टपणे मत मांडले.
“ त्यांनी महाराष्ट्रात जास्त सभा घ्याव्यात”
यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, अशी विनंती केली. अमित शाह यांचे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र दौरे वाढल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रात पंतप्रधानांनी लोकसभेवेळी १८ ठिकाणी सभा घेतल्या. त्यातल्या १४ ठिकाणी त्यांचा पराभव झाला. असं होत असेल, तर आमची विनंती आहे की पंतप्रधानांनी विधानसभेत जास्त वेळा महाराष्ट्रात यावं. इथे आणखी सभा घ्याव्यात”!





