शरद पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजेच शरद पवार – अजित पवार
बारामती – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या मध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपा आणि शिवसेनेचे नेते यांनी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत टीका सुरूच ठेवली आहे. सातारा येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत, शरद पवार यांनी कारखानदारीसाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित केला होता.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा-शिवसेनेचे नेते शरद पवारांनी काय केले? असे विचारण्यासाठी ज्या रस्त्याने बारामतीला येतात ते रस्तेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि बारामतीकरांनी बांधले असल्याचे अजित पवार यांनी म्हंटले आहे. शरद पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजेच शरद पवार असल्याचे सांगून म्हणून तर सगळे जग बारामतीला ओळखत असल्याचे अजित पवार यांनी म्हंटले आहे.
भाजपा-शिवसेनेचे नेते "@PawarSpeaks साहेबांनी काय केलं"? विचारण्यासाठी ज्या रस्त्यानं बारामतीत आले ते रस्तेसुद्धा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बारामतीकरांनी बांधले आहेत, हे लक्षात ठेवा! पवार साहेब म्हणजेच बारामती आणि बारामती म्हणजेच पवार साहेब म्हणून सारं जग बारामतीला ओळखतं.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 21, 2019
दरम्यान, भाजपच्या अनेक नेत्यांनी बारामती मध्ये प्रचार सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती.





