शरद पवारांनी घेतला बारामतीत “जनता दरबार’

जळोची – बारामतीत शनिवारी किंवा रविवारी अजित पवार असले की, त्यांचा जनता दरबार हा ठरलेलाच असतो. गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार हे देखील जनता दरबार घेऊ लागले आहेत. आज मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुक्कामी तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले शरद पवार चक्क राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आले आणि त्यांनी स्वतःच जनता दरबार घेतला.
आज सकाळीच युगेंद्र पवार यांच्या समर्थकांनी बारामती विधानसभेची उमेदवारी युगेंद्र पवारांना द्यावी, अशी मागणी शरद पवारांना भेटून केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू होती. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका विरुद्ध पुतण्याची लढत अटळ असल्याचे बोलले जात आहे.
त्यातच युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याची मागणी झाल्याने बारामतीतही त्याची चर्चा सुरू झाली आणि तेवढ्यात विद्या प्रतिष्ठान मधील बैठकीच्या निमित्ताने एकत्र आलेले युगेंद्र पवार आणि शरद पवार एकाच गाडीतून थेट भिगवण चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाकडे आले.
तेथे दोघांनी एकत्रित आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या तसेच त्यांच्या अडचणी होत्या, त्या अडचणी स्वतः शरद पवारांनी समजावून घेतल्या. या अर्ज घेऊन आलेल्या नागरिकांशी स्वतः शरद पवार यांनी संवाद साधला व माहिती घेतली. सकाळी जे कार्यकर्ते भेटले होते त्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांनी स्पष्ट काही सांगितलं नाही मात्र शरद पवार स्वतःच युगेंद्र पवारांना घेऊन कार्यालयात आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अर्थातच बारामतीच्या विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीत युगेंद्र पवार आणि अजित पवार यांचा सामना थेट होऊ शकतो. तसे झाल्यास बारामतीची विधानसभेची निवडणूक देखील रंगतदार व रोमांचक स्थितीत येऊ शकते.





