कोकणात शरद पवारांना धक्का, बडा नेता भाजपच्या गळाला; राजकीय समीकरणे बदलणार?

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कोकणात राजकीय उलथापालथीला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला असून, रत्नागिरी-चिपळूण मतदारसंघातील बडा नेता प्रशांत यादव यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षप्रवेशाने कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी याबाबत माहिती देत, प्रशांत यादव यांचा पक्षप्रवेश 19 ऑगस्ट रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात होणार असल्याचे जाहीर केले.
प्रशांत यादव यांचा भाजप प्रवेश
रत्नागिरी-चिपळूण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख नेते प्रशांत यादव यांनी भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. नितेश राणे यांनी सांगितले की, प्रशांत यादव यांनी भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केली आहे. “प्रशांत यादव खांद्याला खांदा लावून काम करतील, त्यामुळे कोकणात भाजपची ताकद आणखी वाढेल.
त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा पूर्ण झाली असून, हा प्रवेश निश्चित आहे,” असे राणे यांनी स्पष्ट केले. हा पक्षप्रवेश सोहळा 19 ऑगस्ट रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा
नितेश राणे यांनी यावेळी कोकणातील भाजपच्या वाढत्या ताकदीवर जोर दिला. “गावोगावी आमच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. किरण सामंत आणि निकम यांना प्रत्येकी 20 कोटी रुपये, तर नारायण राणे यांना 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. भाजपशिवाय मित्रपक्षांना निवडणुकीत यश मिळणे कठीण आहे. आमची ताकद आम्ही दाखवून देऊ,” असा दावा राणे यांनी केला. तसेच, चिपळूण गाळप्रश्नी लवकरच एनओसी देण्याचे आणि मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा त्रास कमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कोकणातील राजकीय समीकरणे बदलणार?
प्रशांत यादव यांच्या भाजप प्रवेशाने कोकणातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची चिपळूण आणि रत्नागिरी परिसरातील पकड कमकुवत होऊ शकते, तर भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या पक्षप्रवेशाने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे कोकणातील मतदार आणि कार्यकर्त्यांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.





