निष्ठेचं फळ मिळालं; सक्षणा सलगर यांना शरद पवारांनी दिली राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून महिला पदाधिकारी सक्षणा सलगर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सक्षणा सलगर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवती आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे. पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत झालेल्या मतभेदांनंतर सोनिया दुहान यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली.
त्यानंतर पक्षाच्या महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त होते. अखेर या पदावर आता सक्षणा सलगर यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सक्षणा सलगर यांच्याकडे राज्यात युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पक्षात युवक आघाडीच्या अध्यक्षपदी फहाद अहमद यांची निवड करण्यात आली.
दरम्यान याबाबत बोलताना सक्षणा सलगर म्हणाल्या की, या जबाबदारीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार व्यक्त करते. आधी राज्यात पार पाडत असलेली जबाबदारी राष्ट्रीय स्तरावरही निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडेल.
कोण आहेत सक्षणा सलगर?
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर उत्तम वक्त्या आहेत. सलगर या मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी सक्षणा सलगर २०१२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. नंतर २०१७ च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेची संधी मिळाली. २०१८ मध्ये तत्कालीन एकसंध असलेल्या राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठी गळती लागल्यानंतर तत्कालीन युती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सलगर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र झंजावाती प्रचार केला. मागील निवडणुकीतील झंजावाती प्रचारामुळेच सक्षणा सलगर यांचे नेतृत्व राज्यभर पोहोचले.





