शरद पवार यांना यशवंत विचारांचा विसर

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यशवंत विचारांचा पूर्णपणे विसर पडला आहे. त्यामुळे यशवंत विचारावर बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही. शरद पवार यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देऊन यशवंत विचारांना तिलांजली दिली आहे, अशी कडवट टीका कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
नवी मुंबई बाजार समितीच्या गाळ्यांमध्ये झालेल्या घोटाळ्यांचा आमदार महेश शिंदे यांनी गौप्यस्फोट केला होता. त्यावरुन महायुती व महाविकास आघाडी यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
महेश शिंदे म्हणाले, साताऱ्याच्या राजकारणाला नेहमी यशवंत विचारांचा संदर्भ दिला जातो. मात्र, सातारा जिल्ह्यात शरद पवार यांनी यशवंत विचार मोडले असून भ्रष्टाचारी व्यक्तीला त्यांनी तिकीट दिले आहे. अशा पद्धतीने राजकारण करणे योग्य नाही. सातारा लोकसभेसाठी भ्रष्टाचारी उमेदवारीचा निर्णय घेतल्याने यशवंत विचारांवर बोलण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही. यशवंतराव चव्हाण राजकीय निवृत्तीच्या उंबरठयावर होते. त्यावेळी त्यांची असणारी सांपत्तिक स्थिती आणि वयाने ज्येष्ठ असणाऱ्यांची आर्थिक स्थिती त्यामुळे यशवंत विचार नक्की काय आहे, हे तुमच्या लक्षात येईल. शरद पवार गटाकडून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे आव्हान आहे.
शिंदे यांच्यावरील आरोप हे न्यायालय निर्णयावरून समोर आलेले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांची पाठ राखण करून त्यांना तिकडे देणे हे योग्य नाही, म्हणजे यशवंत विचारांना मूठमाती देण्याचे काम पवार स्वतःच करत असल्याची टीका महेश शिंदे यांनी केली आहे.





