शरद पवार-एकनाथ शिंदे आज कोकणात? मोठे पक्ष प्रवेश होणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sindhudurg News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आज (दि. २४) कोकणच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही दिग्गज नेते एकाच दिवस कोकण दौऱ्यावर असल्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, कोकणात मोठे राजकीय प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शरद पवार आज खासगी दौऱ्यावर वेंगुर्लेत येत आहेत, तर याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांची सायंकाळी ४ वाजता कुडाळ एसटी स्टैंड समोर जाहीर सभा होणार आहे. शरद पवार, एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. खासदार शरद पवार हे त्यांच्या एकदिवशीय दौऱ्यात वेंगुर्त्यातील बॅ. नाथ. पै स्मृती व समुदाय केंद्र येथे भेट देणार आहेत.
केंद्राची विकास प्रक्रिया आणि तेथे चालणाऱ्या उपक्रमांची माहिती शरद पवार घेणार आहेत. तर २५ तारखेला शरद पवार आंबोली येथील ऊस संशोधन केंद्राला भेट देणार आहेत. दरम्यान आता अजित पवार यांच्या कोकण दौऱ्यापाठोपाठ शरद पवार सलग दोन दिवस कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटना वाढीकडे लक्ष देणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे देखील २४ तारखेला सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असणार आहेत. याबाबतची माहिती उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शिंदे हे जनतेचे आभार मानण्यासाठी सभेला येणार असून यावेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. यावेळी काही पक्ष प्रवेश होणार असल्याचे संकेत उदय सामंत यांनी दिले आहेत. तर नावेही लवकरच सांगितली जातील असाही ते म्हणाले होते.





