शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौऱ्यावर

प्रचाराबरोबरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

मुंबई -तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत. प्रचाराबरोबरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद हा त्यांच्या दौऱ्याचा दुहेरी हेतू आहे.

पवार यांच्या दौऱ्याचा प्रारंभ 17 सप्टेंबरपासून होईल. पहिल्या टप्प्यात ते सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर आणि सातारा या दहा जिल्ह्यांमध्ये जातील. त्यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा पवार स्वत:च्या खांद्यावर घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे. महत्वाचे नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडत असले तरी निष्ठावान कार्यकर्ते पक्षाबरोबर ठामपणे उभे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल उंचावण्याची जबाबदारीही पवार यांनी स्वीकारली आहे.

लोकसभा निवडणुकीवेळीही पवार यांनी राज्यातील बऱ्याच भागांचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी सुमारे 80 सभा घेतल्या. आता सत्तारूढ भाजप आणि शिवसेनेला ताकदीने टक्कर देण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष कॉंग्रेसपुढे आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, राज्यातील जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी पवार सज्ज झाले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×