Shantabai Sathe Passes Away: लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कन्या कॉ. शांताबाई साठे यांचं निधन; 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shantabai Sathe Passes Away: कांदिवली येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९० वर्षांच्या होत्या.

Shantabai Sathe Passes Away: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या तथा कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉम्रेड शांताबाई साठे (दोडके) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कांदिवली येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणारा एक महत्त्वाचा आणि स्वाभिमानी आवाज हरपल्याची भावना सामाजिक, सांस्कृतिक आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
शांताबाई या अण्णाभाऊ साठे यांच्या पत्नी कॉम्रेड जयवंताबाई यांच्या कन्या होत. बालपणापासूनच त्यांच्यावर डाव्या विचारसरणीचे संस्कार झाले होते. त्यांनी लहान वयातच बाल संघ आणि तत्कालीन लाल बावटा कला पथकात सक्रिय सहभाग घेत समाजप्रबोधनाचे कार्य केले. सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर जनजागृती केली.
१९४९ मध्ये कम्युनिस्ट पक्षावर सुरू झालेल्या दडपशाहीच्या काळात शांताबाईंनाही तुरुंगवास भोगावा लागला होता. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्याने अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी औषध निर्मिती कंपनीत नोकरी स्वीकारली. नोकरी सांभाळतानाच त्या कामगार संघटनांमध्ये सक्रिय राहिल्या. कामगार हक्क, सामाजिक बांधिलकी आणि संघर्षशील भूमिका त्यांनी आयुष्यभर जपली.
शांताबाईंच्या स्वभावात माणुसकी आणि कुटुंबाविषयीचा जिव्हाळा विशेष होता. स्वतःच्या मर्यादित उत्पन्नातून त्या दरमहा वाटेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या पत्नी कोंडाबाईंना आर्थिक मदत पाठवत असत. अण्णाभाऊंच्या पहिल्या कुटुंबाशी, विशेषतः मुलगा मधुकर यांच्याशी त्यांचे आत्मीय संबंध होते. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून कधीही पाठ फिरवली नाही.
साहित्य आणि रंगभूमीशीही त्यांचे अतूट नाते होते. अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या आणि लोकनाट्यांच्या त्या पहिल्या वाचक मानल्या जात. शाहीर अमर शेख आणि शाहीर दत्ता गव्हाणकर यांच्या कलापथकात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. सत्तरच्या दशकात ‘काय चाललंय गं’ या लोकनाट्यात त्यांनी अभिनय केला होता. तसेच १९८६ मध्ये ‘लोकमंच’ संस्थेच्या गाजलेल्या ‘अकलेची गोष्ट’ या लोकनाट्यात त्यांनी अभिनयासह दिग्दर्शन सहाय्यक म्हणूनही काम पाहिले होते.
कलाकार पेन्शनसाठी संघर्ष –
उतारवयात कलाकार पेन्शन मिळवण्यासाठी शांताबाईंना मोठा संघर्ष करावा लागला. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. शासनाकडे खुशामत न करता त्यांनी स्वाभिमानाने आयुष्य व्यतीत केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या असूनही अपेक्षित सन्मान समाजाकडून मिळाला नसल्याची खंत त्यांना कायम होती. तरीदेखील कष्टकरी, कामगार आणि सामाजिक चळवळीशी असलेली बांधिलकी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली. त्यांच्या निधनाने संघर्षशील, स्वाभिमानी आणि विचारनिष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.





