Pune News | आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीमुळे पीएमपीच्या मार्गात बदल..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती शुक्रवारी (१ ऑगस्ट) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यासाठी शहरासह उपनगरांतून अनेक अनुयायी सारसबाग चौकातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे मुख्य चाैकात गर्दी होत असल्याने दुपारनंतर पीएमपीच्या काही बस मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
सारसबाग चाैकात दुपारच्या सत्रात रस्ता बंद झाल्यावर सदरची वाहतूक लक्ष्मी नारायण टॉकीजकडून डाव्या बाजूस वळवून मित्रमंडळ चौक, सारसबागमार्गे संचलनात ठेवण्यात येणार आहे, तसेच स्वारगेट येथील नटराज बस स्थानकाचा रस्ता बंद झाल्यावर सदर बस स्थानकावरून सुटणाऱ्या बसेस खंडोबा मंदिर, पर्वती पायथा येथून सुटतील आणि रस्ता सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे नटराज बसस्थानकाहून बसेस सुटतील. वरील बसमार्गांमध्ये होणाऱ्या बदलाची प्रवासी नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





