Shambhuraj Desai : पाटणमधील स्मारकांची कामे दर्जेदार व गतीने करावीत; मंत्री शंभूराज देसाई यांचे आढावा बैठकीत आदेश

कोयनानगर : पाटणच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकांच्या उभारणीला आता वेग येणार आहे. या स्मारकांची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
स्मारकांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, तहसीलदार अनंत गुरव, गटविकास अधिकारी सरिता पवार आणि स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. देसाई यांनी निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करून कामाचा पहिला टप्पा सुरू करण्याचे आदेश दिले. निधीची कमतरता भासल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या स्मारकांमुळे पाटणच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीला नवी झळाळी मिळणार असून, स्थानिक जनतेच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत. ही स्मारके केवळ दगडी बांधकामे नसून, पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारी मूल्यांची जिवंत साक्ष ठरणार आहेत.





