शंभूराज देसाई यांच्याकडून दिवाळी फराळाचे आयोजन; कार्यकर्त्यांनी घेतला आस्वाद

कोयनानगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आरोप- प्रत्यारोपांच्या कवित्वाला दिवाळीच्या ४ दिवसाच्या सुट्टीमुळे ब्रेक लागला आहे. 4 दिवस प्रचार थंडावल्याने फराळाच्या निमित्ताने आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या दिवाळी फराळाचे आयोजन दौलतनगर येथील साखर कारखाना कार्यस्थळी करून पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी मताधिक्यासाठी पेरणी केली आहे.
यामुळे दिवाळी फराळ हा कार्यक्रम फराळ पे राजकीय चर्चा असा होऊन या कार्यक्रमाला रंगत आली. गत १० वर्षांपासून पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी असणारे शंभूराज देसाई दिवाळी सणाला दिवाळी फराळ हा कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमाला तालुक्यातून सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतात.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूह व शिवदौलत सह बँक यांच्यावतीने दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी असंख्य कार्यकर्त्याबरोबर दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.
आपल्या माणसाबरोबर दिवाळी साजरी करणे हा नेहमीच आनंद देणारा अनुभव असतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी कोल्हापूर येथील स्वरनिनाद या संगीतसंचाचा मराठी गीत गायनाचा कार्यक्रमाने कार्यकर्त्यांना व रसिकांना मंत्रमुग्ध केले.





