‘शंभूराज देसाई हे डायनॅमिक नेतृत्व… आमच्यासमवेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार’ – खासदार उदयनराजे भोसले

कोयनानगर (प्रतिनिधी) – पालकमंत्री शंभूराज देसाई हे पाटण तालुक्याला लाभलेले डायनॅमिक नेतृत्व आहे. त्यांच्या कल्पकतेने पाटण तालुक्याचा चौफेर विकास होत आहे.
माझ्या विजयात त्यांचे योगदान असून, आगामी विधानसभा निवडणुकीत पाटण मतदारसंघातून शंभूराज देसाई यांना पुन्हा निवडून देण्यासाठी योगदान देणार असल्याची ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
यापुढे काळात जिल्ह्याचे नेतृत्व करायला शिवेंद्रसिंहराजे व माझ्याबरोबर शंभूराजे देखील असून, जिल्ह्याच्या विकासाचा गाडा ते सक्षमपणे हाकत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
सातारा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी दौलतनगर (मरळी) येथे शनिवारी मेळावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सुनील काटकर, अशोकराव पाटील, विजय पवार, कविता कचरे, विजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, पाटण तालुक्यातील जनतेने जीव लावावा, असे नेतृत्व शंभूराज देसाई यांच्या रूपाने मिळाले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे पाटण तालुका विकासात पुढे आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम विरोधकांनी केले. त्याचा फटका महायुतीला बसला. मतदार अपप्रचाराला बळी पडले.
पाटण विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यास कमी पडल्याचे शल्य आहे. जयवंतराव शेलार यांनी प्रास्ताविक केले. विजय पवार यांनी आभार मानले.





