‘देवाच्या नावाखाली कोणी घरावर कोणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही….’

Shaktipith Mahamarg । नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचे काम हाती घेतले असून यासाठी 27 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध वाढत असून शक्तिपीठ महामार्ग तत्काळ रदद करण्याची मागणी शिंदे गटातील नेत्यांकडून केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा तीच पुनरावृत्ती होऊ नये, शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी या महामार्गाच्या विरोधात आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदारने आपल्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.
शिंदे गटाचे नेते, खासदार धैर्यशील माने यांनी सांगलीत आंदोलकांना ग्वाही दिली आहे ते म्हणाले,’शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटूच. पण संसदेमध्ये सुद्धा याबाबत आवाज उठवू” अशी ग्वाही त्यांनी आंदोलकांना दिली आहे. ते पुढे म्हणाले,’देवांच्या नावाखाली आमच्या घरावर कोणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही.’असं म्हणत माने यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
तत्पूर्वी,कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप नेते समरजित घाटगे यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 6 सहा तालुक्यातील शेतजमीन शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार आहे. भुदरगड तालुक्यातील 21, आजरा तालुक्यातील 5, शिरोळ तालुक्यातील 5, हातकणंगले तालुक्यातील 5 करवीर तालुक्यातील 10 व कागल तालुक्यातील 13 गावातून शक्तिपीठ महामार्ग जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. या शेतकऱ्यांच्या अल्प प्रमाणात असणाऱ्या जमिनी शक्तिपीठ महामार्गामध्ये गेल्यास शेतकऱ्यांना उपजिवीकेसाठी जमिन शिल्लक रहाणार नाही, त्यामुळे शेकऱ्यांमध्ये या शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड विरोध दर्शविण्यात येत आहे.


