‘शाजी प्रभाकरन’ यांची All India Football Federation च्या महासचिवपदी नियुक्ती

नवी दिल्ली – दिल्ली फुटबॉलचे अध्यक्ष आणि क्रीडा प्रशासक राहिलेल्या शाजी प्रभाकरन यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. ( Shaji Prabhakaran appointed new secretary general of AIFF ) ही नियुक्ती एआयएफएफच्या नवनियुक्त समितीने आज जाहीर केली आहे. एआयएफएफचे नवे अध्यक्ष कल्याण चौबे यांच्या अध्यक्षाखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
चौबे यांनी एआयएफएफच्या महासचिव पदासाठी प्रभाकरन यांच्या नावाची शिफारस केली, जी सदस्यांनी एकमताने मान्य केल्याची माहिती एआयएफएफने एका निवेदनाद्वारे दिली. एआयएफएफमध्ये बदलाची मागणी करणाऱ्या गटाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या प्रभाकरन यांनी निवडणूक लढवली नाही.
सदस्यांचे स्वागत करताना चौबे म्हणाले, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा माजी दिग्गज खेळाडूंचा समितीचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, एआयएफएफच्या निवडणुकीमुळे भारतीय फुटबॉलमधील काही महिन्यांतील नाट्यमय घडामोडींनाही पूर्णविराम मिळाला आहे.





