BJP Leader Resign : भाजपमध्ये मोठा भूकंप! राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावालांचा राजीनामा; ‘या’ 2 कारणांनी राजकीय वर्तुळात खळबळ
BJP Leader Resign : शहजाद पूनावाला यांनी आर्थिक आणि वैयक्तिक कारणांमुळे भाजप सदस्यत्व व राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा राजीनामा कायम ठेवला. पक्षाने अद्याप राजीनामा स्वीकारलेला नाही.

BJP Leader Resign : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. ३० जुलै २०२६ रोजी त्यांनी राजीनामा दिला होता.
मात्र, पक्षाने तो स्वीकारण्यास नकार देत त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. त्यानंतर पूनावाला यांनी आता पुन्हा पक्षाध्यक्ष नितिन नवीन यांच्याकडे राजीनामा पाठवला असून तो स्वीकारण्याची विनंती केली आहे.
आर्थिक आणि वैयक्तिक कारणांचा उल्लेख –
पूनावाला यांनी आपल्या निर्णयामागे आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थिती असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, ते आता खासगी क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विचारसरणीला तसेच त्यांच्या कार्याला शक्य त्या स्वरूपात पाठिंबा देत राहतील.
पक्ष नेतृत्वाला लिहिलेल्या पत्रात पूनावाला यांनी म्हटले की, ३० जुलैच्या राजीनाम्यानंतर पक्षाने तो तातडीने स्वीकारला नाही आणि निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले. मात्र, मागील काही दिवसांतील घडामोडी आणि त्यांनी पक्षाला सांगितलेल्या काही व्यक्तींशी संबंधित बाबींमुळे आपल्या निर्णयावर ठाम राहणे भाग पडल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांचे मानले आभार –
पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षातील अन्य नेत्यांचे आभार मानले. “मी पक्षाची व्यवस्था सोडत आहे, मात्र विचार आणि व्यक्ती नाही,” असा संदेश त्यांनी दिला.
पूनावाला यांनी भाजपला सोशल मीडिया बायोमधूनही हटवले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सक्रिय राजकारणातून दूर जाण्याची वेळ आल्याचे संकेत दिले होते. तसेच सक्रिय राजकारणातून निवृत्तीबाबतची वक्तव्ये असलेले काही जुने मुलाखतींचे व्हिडिओ पुन्हा शेअर केले होते.
आपल्या पत्रात त्यांनी भाजपमध्ये मिळालेल्या संधीबद्दलही भावना व्यक्त केल्या. “ज्या पक्षावर मी प्रेम केले आणि राष्ट्रीय प्रवक्त्याची जबाबदारी निभावली, त्या पक्षातून मी आता निरोप घेत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.





