शाहांची भेट, फडणवीसांशी अबोला? महायुतीत मतभेदाची जोरदार चर्चा; आपला शत्रू कोण? एकनाथ शिंदेंनी क्लियर केलं म्हणाले…

Eknath Shinde : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. यामुळे अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून, स्थानिक पातळीवर राजकीय गरज पाहता निर्णय घेतले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे शिंदे नाराजी असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.
या भेटीत शिंदेंनी शाहांसमोर आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाच्या निमित्ताने आमने-सामने आल्यानंतर दोघांच्या देहबोलीवरून काहीतरी खटकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. यामुळे महायुतीत तणाव तर निर्माण झाला नाही ना? असा प्रश्न विचारला जात होता. अशातच एकनाथ शिंदे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी अक्कलकोट येथे याबाबत एक महत्वाचे विधान केले आहे.
खरमरीत शब्दांत टीका
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काहींच्या पोटात दुखायला लागले आहे. अजूनही काहींना एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला पचत नाही. त्यामुळे त्यांची मळमळ अजूनही सुरूच आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. मी कुठून आलो? एक साधा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, ही गोष्ट काहींना अजूनही समजत नाही. माझे नाव घेतल्याशिवाय काही लोकांना झोप लागत नाही, भूक लागत नाही आणि दिवस सुरु होत नाही, अशा खरमरीत शब्दांत शिंदेंनी विरोधकांना सुनावले.





