Shahid Kapoor : ज्युनिअर एनटीआरच्या ‘ड्रॅगन’मध्ये शाहिद कपूरची एन्ट्री? महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा
Shahid Kapoor : अशातच या चित्रपटाविषयी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Shahid Kapoor : ज्युनियर एनटीआरच्या बहुचर्चित ड्रॅगन चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार असून चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. मात्र, चित्रपटातील एका अॅक्शन सीनचे चित्रीकरण करताना अभिनेता ज्युनिअर एनटीआरला दुखापत झाली होती. यामुळे त्याने चित्रीकरणातून काही दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच या चित्रपटाविषयी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात बॅालिवूड अभिनेत्री आलिया भट्टची एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली होती. आता अभिनेता शाहिद कपूर देखील ड्रॅगचा भाग असणार असल्याचे वृत्त आहे. हा चित्रपट ११ जून २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिव्हील करण्यात आला होता. हा लूक पाहून चित्रपटाविषयी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
शाहिद कपूर ‘ड्रॅगन’चा भाग असणार
साऊथ अभिनेत्री रुक्मिणी वसंत या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. एका रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेते शाहिद कपूर आणि आलिया भट्ट या चित्रपटाचा भाग असणार आहेत. दोघांच्या विशेष भूमिका चित्रपटात असतील. मात्र, शाहिद कपूरच्या अधिकृत एन्ट्रीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच चित्रपटातील निर्मात्यांनीही शाहिदच्या चित्रपटातील प्रवेशाची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.
आलिया भट्ट आणि ज्युनियर एनटीआर यांनी यापूर्वी ‘आरआरआर’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ते दुसऱ्यांदा एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. ‘ड्रॅगन’मध्ये बिजू मेनन, खुशबू सुंदर, गुरू सोमासुंदरम, राजीव कनाकाला, अनिल कपूर आणि आशुतोष राणा यांसारखे कलाकारांच्या भूमिका आहेत.
शाहिद कपूरच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तो शेवटचा ‘कॉकटेल २’ या चित्रपटात दिसला होता. ज्यात क्रिती सॅनॉन आणि रश्मिका मंदाना सह-कलाकार होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. याशिवाय तो त्याच्या आगामी ‘फर्जी’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनची तयारी करत आहे.




