‘पठाण’च्या यशासाठी शाहरुख खान करतोय देवदर्शन; मध्यरात्री पोहचला ‘वैष्णो देवी’च्या दरबारात

मुंबई – बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच, अभिनेता ‘शाहरुख खान’ सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच अभिनेत्यानं त्याच्या आगामी “डँकी’ चित्रपटाचं सौदी अरेबिया मधील शूटिंग पूर्ण केलं आहे. दुसरीकडे आजच शाहरुखच्या बहुचर्चित अश्या ‘पठाण’ चित्रपटातील पहिले ‘बेशरम रंग’ हे संपूर्ण गाणे रिलीज करण्यात आले आहे. 11 वाजता चित्रपटाचे गाणे प्रदर्शित करण्यात आले. अभिनेत्याने सोशल मीडियावर या संदर्भातील एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
दरम्यान, असं असलं तरी शाहरुख खानचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्यानं मध्यरात्री काही साथीदारांसह ‘माँ वैष्णो देवी’च्या दरबारात हजेरी लावली असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान त्याने तोंडाला मास्क आणि चष्मा लावला होता, जेणेकरून कोणीही त्याला ओळखू नये. मात्र, तरी देखील अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशलवर व्हायरल झालाच.
शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे सोशल मीडियावरही बहिष्कार मोहीम बराच काळ सुरू आहे. अशा परिस्थितीत शाहरुख खानने ‘माँ वैष्णो देवी’च्या दरबारात हजेरी लावणे महत्त्वाचे समजले गेले आहे.
दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये हा रिलीज होणार आहे. परंतु चाहत्यांना चित्रपटाच्या कथेबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. कारण त्याचा ट्रेलर किंवा प्रोमो अजून रिलीज झालेला नाही. सध्या सोशल मीडियावर चित्रपटातील हे गाणं चांगलंच व्हायरल होत असून, फॅन्स देखील यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.





