Bihar Election: घुसखोरांवरून शहांची लालू-राहुल यांच्यावर टीका: बिहारचे भविष्य ‘जंगल राज’ विरुद्ध ‘विकास’ यावर ठरवले जाईल

खगडिया: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी बिहारच्या खगडिया येथे आयोजित केलेल्या एका जाहीर सभेत, आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य करताना ‘जंगलराज’ची वापसी होणार की विकास कायम राहणार, हे ठरणार असल्याचे सांगितले.
शहा यांनी यावेळी महाआघाडीवर (महागठबंधन) घुसखोरांना पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, विरोधकांनी कितीही सभा घेतल्या तरी, “आमचे सरकार प्रत्येक घुसखोराला शोधून त्यांच्या देशात परत पाठवेल.” त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही टीका करत, ‘राहुल बाबा घुसखोरांना वाचवू शकणार नाहीत,’ असे स्पष्ट केले.
‘जंगलराज’ की ‘विकसित बिहार’?
शहा यांनी बिहारच्या जनतेला आवाहन करताना म्हटले की, ही निवडणूक कोणाला आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री बनवण्यासाठी नाही, तर लालू-राबडी यांच्या ‘जंगलराज’ची पुनरावृत्ती होते की NDA च्या नेतृत्वाखालील ‘विकसित बिहार’ देशात आपली ओळख निर्माण करतो, हे ठरवण्यासाठी आहे.
लालू यादव और राहुल बाबा को घुसपैठियों में अपना वोट बैंक दिखता है। राहुल बाबा, चाहे जितनी भी घुसपैठिया बचाओ रैली निकाल लो, आप घुसपैठियों को बचा नहीं सकते। pic.twitter.com/FTuLw81aRl
— Amit Shah (@AmitShah) October 25, 2025
त्यांनी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे आरोप केले, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकार राज्याचा समग्र विकास साधत असल्याचे नमूद केले. NDA सरकारने ‘जंगलराज’ संपवले, नक्सलवादावर नियंत्रण मिळवले आणि विधवा/वृद्धापकाळ निवृत्ती वेतनात वाढ, आशा सेविकांचे मानधन आणि ‘जीविका’च्या महिलांसाठी आर्थिक मदत यांसारखी महत्त्वाची विकास कामे केल्याचे शहांनी यावेळी सांगितले.
छठ महापर्वाच्या शुभेच्छा देत शहांनी बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्था कायम राहावी आणि राज्याची विकास वाटचाल अशीच सुरू राहावी, अशी इच्छा व्यक्त केली.





