Shabana Azmi: बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी सध्या त्यांच्या आगामी ‘लाहोर १९४७’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या नावावर पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याचा मानही त्यांच्याकडे आहे. मात्र अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी “आता मला कोणीच नॅशनल अवॉर्ड देत नाही” असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘लाहोर १९४७’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे. या चित्रपटात सनी देओल आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती आमिर खान यांनी केली आहे. शबाना आझमींनी या सर्वांसोबत पहिल्यांदाच काम केले आहे. एका मुलाखतीत शबाना आझमींना विचारण्यात आले की, ‘लाहोर १९४७’मधील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळेल का? यावर त्या हसत म्हणाल्या, “आता मला कोणीच नॅशनल अवॉर्ड देत नाही.” मात्र त्यांनी लगेचच स्पष्ट केले की त्यांच्यासाठी अभिनय हेच सर्वात मोठं समाधान आहे. पुरस्कार महत्त्वाचे असतात, पण तेच काम करण्यामागचं एकमेव कारण नसतं. Shabana Azmi या चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “आम्ही या चित्रपटाचे शूटिंग खूप आधी पूर्ण केले होते. आता तो प्रदर्शित होतोय, याचा आनंद आहे. या प्रोजेक्टमध्ये माझ्यासाठी अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडल्या. मी यापूर्वी कधीच राजकुमार संतोषी किंवा आमिर खान यांच्यासोबत काम केले नव्हते. सनी देओल आणि प्रीती झिंटा यांच्यासोबतही हा माझा पहिलाच अनुभव आहे. दोघांसोबत काम करताना खूप मजा आली.” चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, “या चित्रपटात मी साकारलेली स्त्री खूप रडते. पडद्यावर मी इतकं कधीच रडले नव्हते.” त्यांनी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्याबद्दलही कौतुक केले. “ते ओल्ड स्कूल आहेत, पण त्यांना नेमकं काय हवं आहे याची त्यांना पूर्ण खात्री असते. हा विषय त्यांनी अनेक वर्षांपासून मनात जपला होता. आमिर खान यांनी त्यांना हा चित्रपट त्यांच्या मनाप्रमाणे बनवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं,” असे त्या म्हणाल्या. शबाना आझमींच्या वक्तव्यामुळे पुरस्कारांपेक्षा कामावर प्रेम करणाऱ्या कलाकाराची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, सेटवर जाण्याची त्यांची खरी प्रेरणा म्हणजे अभिनयाची आवड. पुरस्कार मिळाले तर आनंदच आहे, पण तेच अंतिम ध्येय नाही. ‘लाहोर १९४७’ हा दमदार विषय असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शबाना आझमींची भावनिक भूमिका प्रेक्षकांना नक्कीच वेगळी अनुभूती देईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.