ममता बॅनर्जींच्या ब्रिटनमधील भाषणावेळी विद्यार्थ्यांची निदर्शने, देशातील राजकारण तापले

कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ब्रिटनमधील भाषणावेळी तरूणांच्या एका गटाने निदर्शने केली. त्यावरून भारतातील राजकारण तापले आहे. प्रामुख्याने ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
ब्रिटन दौऱ्यात ममतांचे गुरूवारी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या केलॉग कॉलेजमध्ये भाषण झाले. सामाजिक विकास आणि महिला सबलीकरण हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. त्यांच्या भाषणावेळी ब्रिटनस्थित स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय-युके) या संघटनेच्या सदस्यांनी निदर्शने केली. ती संघटना माकपची विद्यार्थी शाखा आहे. निदर्शकांनी काही फलक झळकावले. तसेच, काही प्रश्न विचारत ममतांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.
कोलकत्याच्या आर.जी.कर रूग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरण, सिंगुरमधून टाटा मोटर्सचे बाहेर जाणे आदी मुद्द्यांशी निगडीत प्रश्न निदर्शकांनी विचारण्याचा प्रयत्न केला.
निदर्शनांना शांततेने सामोरे जात ममतांनी निदर्शकांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी निदर्शकांना चॉकलेटची ऑफर दिली. त्याचवेळी त्यांना इशाराही दिला. तुमच्या नेत्यांच्या भेटीवेळी अशाच शोची पुनरावृत्ती होऊ शकते. डाव्या विचारसरणीच्या माझ्या मित्रांनो असे वागणे बरे नव्हे, असे त्या म्हणाल्या. ब्रिटनमधील घडामोडीचे पडसाद भारतात उमटून तृणमूल आणि डाव्या पक्षांमध्ये जुंपली.
निदर्शक ऑक्सफर्डचे विद्यार्थी किंवा ब्रिटीश नागरिक नव्हते. मुख्यमंत्र्यांचा अवमान करण्याच्या इराद्यातून त्यांनी भारताचाच अनादर केला. बंगालमधील डाव्यांच्या राजवटीत जे काही घडले; ते निदर्शक विसरले. डाव्या पक्षांच्या समर्थकांनी त्यांच्या कृतीतून केवळ बंगालची नव्हे; तर संपूर्ण देशाची अप्रतिष्ठा केली, अशी तीव्र प्रतिक्रिया तृणमूलच्या गोटातून देण्यात आली. एसएफआयनेही आक्रमक शैलीत भूमिका मांडली. ममता जातील तिथे आम्ही त्यांना प्रश्न विचारू. नाराज असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समुदायाकडून विचारल्या जाणाऱ्या कठोर प्रश्नांपासून त्यांची सुटका होणार नाही, असे त्या संघटनेने म्हटले.





