Pimpri : हिंजवडीसह सात गावे पालिकेत समावेशाच्या मार्गावर

हिंजवडी : मुळशी व मावळ तालुक्यातील हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे व गहुंजे या आयटी पार्कलगतच्या सात गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
खासदार श्रीरंग बारणे व आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी हिंजवडीचे वसंत साखरे, तानाजी हुलावळे, आनंद बुचडे, बाबासाहेब साखरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व आयटी क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
या भागात वाढते शहरीकरण, आयटी व गृहप्रकल्पांचा वाढता विस्तार, व त्यासोबत निर्माण झालेल्या नागरी समस्या यामुळे स्थानिक ग्रामपंचायतींवरचा ताण वाढला आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक तरंगती लोकसंख्या असलेल्या या परिसरातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा व वाहतूक व्यवस्थेत समन्वयाचा अभाव जाणवतो. या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध विकासासाठी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. या प्रस्तावाची २०१५ पासून पाठपुरावा सुरू असून आता निर्णयाच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत आहे.
बैठकीकडे सर्वांचे लक्ष
हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या समस्या आणि आयटीयन्सचा उद्रेक लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी, १० जुलै रोजी दुपारी २ वाजता विधानभवनात उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत एमआयडीसी, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, पालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयटी प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, आयटी पार्कच्या समस्या मांडल्या जाणार आहेत.
पीएमआरडीएचा प्रस्तावित विकास आराखडा रद्द झाल्याने समस्यांसोबत या भागात बकालीकरण वाढत आहे. आमच्या शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या जमिनीवर पीएमआरडीए कडून टीपी स्कीम लादण्यात येणार असल्याने त्यास अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे. आम्ही चार गावच्या लोकांना एकत्र घेऊन महानगरपालिका समावेशाची मागणी केली आहे. त्यास मुख्यमंत्र्यांनी लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला.
– तानाजी हुलावळे (माजी उपसरपंच, हिंजवडी)
तीन चार गावातील आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता दोघांनी याबाबतीत सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. गावांच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः बैठक घेणार आहेत. सद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने या निवडणुका संपताच ही गावे महानगरपालिकेत समाविष्ठ करण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
– वसंत साखरे, (ग्रामस्थ, हिंजवडी)
हिंजवडी आणि परिसरातील सात गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून मूलभूत सुविधांचा अभाव आहे. आयटी हब म्हणून ओळख असलेल्या या भागाचा नियोजनबद्ध विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या, जल व वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे, प्रदूषण यामुळे या गावांचा महापालिकेत समावेश होणं अपरिहार्य आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत समावेशाची मागणी केली. त्यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश देऊन सकारात्मक भूमिका घेतल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.”
– श्रीरंग बारणे, खासदार
हिंजवडी आयटी पार्कमध्ये पाच लाख आयटी कर्मचारी नियमित ये-जा करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. तसेच विविध यंत्रणेमध्ये समन्वय नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचा आयटी पार्क पण सुविधांअभावी जगभरात शहराची प्रतिमा मलीन होते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी विनंती केली आहे. त्याबाबत बैठकीमध्ये निश्चितपणे ठोस निर्णय होईल, असा विश्वास आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
हिंजवडीसह माण-मारुंजी, गहुंजे, जांबे, लवळे, नांदे, पिरंगुट, भुकुम या भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. मात्र रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज अशा मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे या भागासाठी स्वतंत्र प्रशासकीय संस्था किंवा सक्षम नोडल अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करावी. मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करून लवकर निर्णय घ्यावा ही विनंती.
– सुप्रिया सुळे, खासदार
हिंजवडीसह आसपासच्या या भागांचा विकास स्थानिक ग्रामपंचायतीच्या क्षमतेबाहेर गेला आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी आणि नियोजनबद्ध नागरीकरणासाठी या गावांचा तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ते स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीबाबत सकारात्मक आहेत.
-शंकर जगताप, आमदार





