कर्नाटक : परीक्षेला हिजाब घालण्याची परवानगी दिल्याने 7 शिक्षकांचे निलंबन

हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसू दिल्याबद्दल गाबाग जिल्ह्यात सात शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. निलंबित केलेले हे शिक्षक सीएस पाटील शाळेत परीक्षा निरीक्षक होते. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये केंद्र अधीक्षक पदाचा कार्यभार असलेल्या दोन शिक्षकांचाही समावेश आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने उडुपी गव्हर्नमेंट प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेजच्या मुस्लिम विद्यार्थिनींची हिजाब बंदीविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. हिजाब घालणे हा इस्लामिक धर्मात आवश्यक असलेल्या धार्मिक प्रथेचा भाग नाही त्यामुळे यास मान्यता देण्यास नकार देत उच्च न्यायालयाने शालेय गणवेशाचे पालन करण्यास सांगितले होते.
न्यायालयाने हिजाबवर बंदी घातली तरीसुद्धा विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करण्याचा करण्याचा हट्ट धरला आहे. वर्गात हिजाब घालण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी मुलांनी परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. दरम्यान काही महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी न्यायालयाच्या आदेशानंतरही हिजाब परिधान करण्याचा हट्ट कायम ठेवला होता.





