सात शिलेदार ठाकरेंची साथ सोडणार? शिंदेंच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवावी लागली आहे. शिंदे यांनी शिवसेना पक्षावर देखील दावा सांगितला असून पक्ष आपल्याकडेच राहावा यासाठी उद्धव ठाकरे न्यायालयीन व जमिनीवरील अशा दोन्ही लढाया लढताना दिसतायेत. शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला शिवसेनेतील अनेक बड्या नेत्यांनी, आमदार-खासदारांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला एका मागून एक धक्के बसताना दिसत आहेत. अशातच आज दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.
शिंदे गटाच्या नेत्यांकडून आजच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले ३ आमदार व २ खासदार एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारणार असल्याचा दावा करण्यात आलाय. अर्थात, हे आमदार, खासदार कोण याचा उलगडा अद्याप झालेला नाहीये. त्यामुळे, हा दावा खरा असल्यास एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणारे ते ५ नेते कोण याबाबतची जोरदार चर्चा रंगली आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे यंदाही होणार असला तरी शिंदे गटाचा मेळावा बेकीसी मैदानात तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. दोन्ही बाजूंकडून आपल्याच दसरा मेळाव्याला अधिक गर्दी जमावी यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिंदे व ठाकरे समर्थक आपापल्या नेत्यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.
शिंदेंच्या मेळाव्यात दोन खासदार, ५ आमदारांचा प्रवेश?
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात दोन खासदार आणि पाच आमदार प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी हा मोठा दावा केला आहे. शिंदे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात बीकेसीत शिवसेनेतील ५ आमदार आणि २ खासदार शिंदे गटात प्रवेश करतील, असं कृपाल तुमाने यांनी म्हटलं आहे.





