satara | सेवागिरी महाराज दिंडीचे सोमवारी प्रस्थान

पुसेगाव, (प्रतिनिधी)- येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे दि. ८ ते १८ जुलैदरम्यान आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपाहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच औषधोपचाराची मोफत सोय केली आहे.
या दिंडीत पुसेगाव व पंचक्रोशीतील अधिकाधिक वारकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव व विश्वस्तांनी केले.
श्री सेवागिरी देवस्थानच्या पायी पालखी सोहळ्याचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. आठ जुलैला सकाळी ७.३० वाजता श्री सेवागिरी महाराज पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होईल.
सोमवारी (ता. आठ) महिमानगड, मंगळवारी (ता. नऊ) लोधवडे, बुधवारी (ता. १०) म्हसवड, गुरुवारी (ता. ११) पिलीव, १२ जुलैला तांदूळवाडी, १३ जुलैला भाळवणी, १४ जुलैला उपरी, १५ जुलैला वाखरी, १६ जुलैला पंढरपूर मुक्कामी पोचेल.
१७ जुलैला चंद्रभागेत स्नान करून नगर प्रदक्षिणा होईल. १८ जुलैला चंद्रभागा स्नान करून दुपारी एकनंतर दिंडी तीर्थक्षेत्र पुसेगावकडे ट्रकमधून प्रस्थान करेल. दिंडी सोहळ्यादरम्यान ठिकठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन, भारुड, हरिपाठ, दैनंदिन आरतीचा कार्यक्रम होईल. विश्वस्तांनी दिंडीच्या दुपारच्या जेवणाच्या व मुक्कामाच्या जागांची पाहणी करून उत्तम नियोजन केले आहे.
ट्रस्टमार्फत दिंडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांचा अपघाती विमा उतरवला जाईल. मुक्कामाच्या ठिकाणी निवाऱ्यासाठी अतिरिक्त तंबूची सोय केली आहे. पंढरपूर येथील मुक्कामात वारकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोयीसुविधांयुक्त प्रशस्त निवाऱ्याची सोय ट्रस्टतर्फे केली आहे.
दिंडी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.





