शॉट कायशावर सीरमचा ताबा ! लस उत्पादनातील अडथळे दूर होण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

पुणे – करोनावरील लसीचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने लस उत्पादनासाठी आवश्यक तो सर्व कच्चा माल एकाच ठिकाणी मिळवून देणारी शॉट कायशा या कंपनीचे 50 टक्के समभाग खरेदी केले. त्यामुळे लस उत्पादनात येणारे अडथळे दूर करण्यात सीरम यशस्वी ठरण्याची शक्यता आहे.
व्यापक लसीकरण मोहीम देशांत सुरू असली तरी अद्याप त्यात म्हणावा असा लक्षणीय टप्पा गाठण्यात यश आलेले नाही. अद्याप दोनही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी आहे. अनेक राज्ये विशेषत: विरोधी पक्षांची सरकारे असणाऱ्या राज्यांकडून लस पुरवठा अपुरा होत असल्याच्या तक्रारी आहेत.
सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातली माहिती दिली. दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आलेले पत्रकच अदर पूनावाला यांनी आपल्या ट्वीटसोबत शेअर केले आहे.
“देशातील लस उत्पादक उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं फार आवश्यक आहे. हेच साध्य करण्यासाठी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने शॉट कायशामधील 50 टक्के समभाग खरेदी केले आहेत. भारतीय लस उद्योग विश्वासाठी औषध पॅकेजिंग उत्पादनांचा अखंड पुरवठा होणे यामुळे शक्य होणार आहे’, असें अदर पूनावाला यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
शॉट कायशा ही फार्मा पॅकेजिंग क्षेत्रातली भारतामधील महत्त्वाची कंपनी आहे. शॉट ही जर्मनीमधील काच उत्पादक कंपनी आणि कायशा ही भारतातील कंपनी यांच्या भागीदारीतून शॉट कायशा या कंपनीची निर्मिती झाली आहे. देशभरात सर्वाधिक 2.5 बिलियन व्हायल्स प्रतिवर्षी ही कंपनी उत्पादित करते. या वर्षभरात तब्बल 380 मिलियन व्हायल्सची विक्री करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.
दरम्यान, दोन्ही कंपन्यांनी कराराच्या एकूण रकमेचा आकडा जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याचं शॉट इंडियाच्या प्रतिनिधीने रॉयटर्सला पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिरम इस्टिट्युट शॉट कायशाकडून औषधांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी करत आहे. यामध्ये लसींच्या साठवणुकीसाठी लागणाऱ्या व्हायल्स आणि सिरींजचा समावेश आहे.



