Khopoli : खोपोलीतील डॉ. केजरीवाल यांच्या रुग्णालयात नवजात बालकाच्या मृत्यूचा गंभीर आरोप; पीडित कुटुंबीय आक्रमक
Khopoli : मंगळवारी, 6 ऑक्टोबर रोजी त्या ड्रेसिंगसाठी रुग्णालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी नवजात मुलीची सुद्धा तपासणी केली.

खालापूर, रायगड : प्रसूतीनंतर तपासणीसाठी आलेल्या शाहिस्ता मुस्तफा जळगावकर यांच्या आठ दिवसांच्या नवजात मुलीचा मृत्यू झाल्याची घटना खोपोलीत घडली. डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळेच मुलीची प्रकृती खालावून मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहिस्ता मुस्तफा जळगावकर यांची आठ दिवसांपूर्वी डॉ.केजरीवाल यांच्या रुग्णालयात प्रसूती झाली होती. मंगळवारी, 6 ऑक्टोबर रोजी त्या ड्रेसिंगसाठी रुग्णालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी नवजात मुलीची सुद्धा तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी मुलीची प्रकृती ठीक नसून डॉ.केजरीवाल यांनी तपासणी करून तिला कावीळ झाल्याचे सांगितले आणि औषध लिहून दिले.
त्या औषधाचे 4 थेंब त्या मुलीला देण्यास सांगितले, औषध दिल्यानंतर बाळाच्या नाकातून अचानक रक्त आल्याने अचानक खालावल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानंतर तिला पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर संतप्त नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाल्याने रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. नवजात मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल होण्याची शक्यता असून पुढील तपास खोपोली पोलिसांचा सुरू आहे.





