Parliament March : तरुणांना भडकवल्याचा गंभीर आरोप; ‘या’ तीन पक्षांचा उल्लेख, दिल्ली पोलिसांच्या रिपोर्टमध्ये काय?
Parliament March : दिल्ली पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती हाती लागली असून त्यांच्याकडून या प्रकरणात मोठे दावे करण्यात आले आहेत.

Parliament March : दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती हाती लागली असून त्यांच्याकडून या प्रकरणात मोठे दावे करण्यात आले आहेत.
कॅाक्रोच जनता पार्टीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या २० जुलैच्या संसदेवरील धडक मोर्चात झालेला हिंसाचार हा केवळ विद्यार्थ्यांच्या संतापाचा परिणाम नसून तो एका सुनियोजित कटाचा भाग असल्याचा मोठा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. यामुळे आंदोलनात झालेल्या हिंसाचार प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं आहे.
चौकशीसाठी पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात येणार (Parliament March)
संसद येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका एफआयआरमध्ये काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या संभाव्य सहभागाचा उल्लेख करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात दिल्लीतील आम आदमी पार्टी (आप), उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टी (सपा) आणि भीम आर्मीशी संबंधित काही व्यक्तींची भूमिका तपासली जाणार असून त्यांना चौकशीसाठी पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करण्यासाठी तो विशेष कक्षाकडे वर्ग करण्यात आला आहे.
२१ एफआयआरची नोंद (Parliament March)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद मोर्चादरम्यान घडलेली घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण २१ एफआयआर नोंदवण्यात आले असून त्यापैकी एका एफआयआरमध्ये काही राजकीय घटकांवर हिंसाचार भडकवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये हिंसाचाराशी संबंधित घटनांचा तपशील देण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमे, शस्त्र कायदा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सीसीटीव्ही आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी (Parliament March)
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे आणि सोशल मीडियावरील सामग्रीच्या आधारे हिंसाचारामागील सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. तपासादरम्यान काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून जमावाला संबोधित केल्याची माहिती समोर आली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, उपलब्ध कागदपत्रे, डिजिटल पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इंटरनेटवरील माहितीच्या आधारे एका संघटित कटाची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण घटनाक्रमामागे आर्थिक पाठबळ पुरविण्यात आल्याचाही संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
जमावाला भडकवल्याचा आरोप (Parliament March)
एफआयआरनुसार, २० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या संसद मोर्चासाठी मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी घोषणाबाजी करत जमावाला भडकवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि पोलिसांवर हल्ला तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात हत्येच्या प्रयत्नापासून गुन्हेगारी कट, दंगल, बेकायदेशीर जमाव, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे, शस्त्र कायद्याचे उल्लंघन आणि दिल्ली पोलीस कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.





