Accidents: कामशेत-कुसगाव रस्त्यावर अपघातांचे सत्र; स्पीडब्रेकरअभावी नागरिकांचा जीव धोक्यात
मूलभूत सुरक्षात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष

– चेतन वाघमारे
कामशेत – मावळ तालुक्यातील कामशेत-कुसगाव रस्त्याचे काम पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मात्र रस्ता तयार करताना आवश्यक स्पीडब्रेकर आणि साईडपट्ट्या न बनविल्याने या मार्गावर अपघातांचा धोका वाढला आहे. आतापर्यंत दोन स्थानिक नागरिकांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागले आहे.
तसेच एका वयोवृद्ध व्यक्तीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून, पुण्यातील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कामशेत-कुसगाव रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध नागरिक आणि स्थानिक ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र रस्त्यावर स्पीडब्रेकर नसल्याने वाहनचालक वेगाने वाहने चालवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे काम करतानाच आवश्यक ठिकाणी स्पीडब्रेकर बसविणे गरजेचे होते. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईडपट्ट्या तयार करणेही आवश्यक होते. मात्र या मूलभूत सुरक्षात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
कामशेत-कुसगाव रस्त्यावर वारंवार अपघात होण्याची शक्यता असताना पीएमआरडीए प्रशासन आणखी किती गंभीर अपघातांची वाट पाहत आहे? एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. पीएमआरडीए प्रशासनाने या रस्त्याची तातडीने पाहणी करावी.
आवश्यक ठिकाणी शास्त्रीय निकषांनुसार स्पीडब्रेकर बसवावेत, दोन्ही बाजूंना साईडपट्ट्या तयार कराव्यात, वेगमर्यादेचे फलक लावावेत आणि रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्त्यावर मोठ्या वाहनांचे पार्किंग
कामशेत-कुसगाव रस्त्यावर मोठ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर पार्किंग केले जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी वाहनांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना वाट काढताना कसरत करावी लागते. यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे.
‘हा रस्ता काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर स्पीडब्रेकर नसल्याने वाहनचालक वेगाने वाहने चालवतात. या मार्गावरून वयोवृद्ध नागरिक आणि विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर या प्रमुख रस्त्यावर स्पीडब्रेकर बसवावेत.’ – प्रदीप अमरावतकर, स्थानिक नागरिक
दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी एका वयोवृद्ध व्यक्तीचा मोठा अपघात झाला. ते गंभीर जखमी असून पुण्यातील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. पीएमआरडीएने रस्ता तयार करतानाच स्पीडब्रेकर बसवणे गरजेचे होते. भविष्यात आणखी मोठे अपघात होऊ शकतात. त्याला प्रशासन जबाबदार राहील.’ – गणेश शिंदे, स्थानिक नागरिक
‘पीएमआरडीएने रस्ता तयार केला, मात्र नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वस्ती असल्याने साईडपट्ट्या आणि स्पीडब्रेकर असणे आवश्यक आहे. या मार्गावरून वाहने सुसाट जात असल्याने मोठे अपघात झाले आहेत. प्रशासनाने तातडीने स्पीडब्रेकर बसवावेत, अन्यथा मोठे जनआंदोलन करण्यात येईल.’ – बेला मंडेलिया, स्थानिक नागरिक
Satara: राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत सातारा जिल्ह्याला उपविजेतेपद





