Saving water : पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष; महापौरांचे प्रशासनाला आदेश
Saving water : पाणीगळती, चोरी रोखण्यासह २४ तासांत तक्रार निवारणाचे निर्देश

पुणे : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यासह पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी महापालिकेच्या सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र पाणीटंचाई व आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या कक्षांमध्ये पाणीपुरवठा, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांचे अधिकारी व कर्मचारी २४ तास कार्यरत ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारींचे २४ तासांत निवारण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
धरणांमधील मर्यादित जलसाठ्यामुळे शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापौरांनी २९ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आणि अपव्यय रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप तक्रार निवारण व्यवस्था सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाणीगळती, टँकरची मागणी आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे २४ तासांत निराकरण करावे, असे पत्रात नमूद केले आहे.
शहरातील उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करावे. शहराच्या शेवटच्या टोकावरील भागांनाही समान आणि पुरेसा पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. मुख्य जलवाहिन्या, वितरण वाहिन्या आणि पाण्याच्या टाक्यांमधील गळती शोधण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यासह अनधिकृत नळजोडण्या आणि पाणीचोरीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणे, खासगी बांधकामे, स्विमिंग पूल, बगीचे आणि रस्ते धुण्यासाठी करण्यास बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि नळजोडणी खंडित करण्याचे निर्देश दिले आहेत.
टंचाईग्रस्त भागांत महापालिकेमार्फत मोफत टँकर उपलब्ध करून देणे, खासगी टँकरच्या दरांवर नियंत्रण ठेवणे आणि पाण्याचा काळाबाजार रोखण्यावरही भर देण्यात आला आहे. या सर्व उपाययोजनांवरील कारवाईचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत महापौर कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.





