Egg Soup Recipe: एका अंड्यापासून बनवा रेस्टॉरंट स्टाइल एग ड्रॉप सूप; मऊ अंड्याच्या रिबन्समुळे चव होईल दुप्पट!
Egg Soup Recipe अंडे हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेली नऊ अमिनो अॅसिड्स असतात. त्यामुळे रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतींचा प्रयोग करता येतो. त्यापैकीच एक म्हणजे एग ड्रॉप सूप. चला तर मग, जाणून घेऊया हे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.

Egg Soup Recipe: अंड्यापासून ऑम्लेट, भुर्जी किंवा उकडलेली अंडी खाऊन कंटाळा आला आहे का? मग यावेळी काहीतरी वेगळं करून पाहा. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरीच रेस्टॉरंटसारखं ‘एग ड्रॉप सूप’ बनवू शकता. या सूपचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात तयार होणाऱ्या अंड्याच्या मऊ, पातळ रिबन्स. चवीला रुचकर असण्यासोबतच हे सूप बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. थंडीच्या दिवसांत किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
अंडे हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेली नऊ अमिनो अॅसिड्स असतात. त्यामुळे रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतींचा प्रयोग करता येतो. त्यापैकीच एक म्हणजे एग ड्रॉप सूप. चला तर मग, जाणून घेऊया हे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.
एग ड्रॉप सूप बनवण्यासाठी साहित्य
– १ अंडे
– दीड कप व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी
– १ छोटा चमचा कॉर्नफ्लोअर
– १ मोठा चमचा थंड पाणी
– १ छोटा चमचा बारीक चिरलेला हिरवा कांदा
– पाव छोटा चमचा काळी मिरी पावडर
– चवीनुसार मीठ
– अर्धा छोटा चमचा सोया सॉस

Egg Drop Soup
एग ड्रॉप सूप बनवण्याची सोपी पद्धत
१. सर्वप्रथम सूपचा बेस तयार करा
एका पॅनमध्ये दीड कप व्हेजिटेबल स्टॉक घ्या आणि तो गरम करायला ठेवा. व्हेजिटेबल स्टॉक उपलब्ध नसेल, तर साध्या पाण्याचाही वापर करू शकता. पाण्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि आवडीनुसार थोड्या बारीक चिरलेल्या भाज्या घालून सूपचा बेस तयार करता येतो. चव वाढवण्यासाठी त्यात अर्धा छोटा चमचा सोया सॉस घाला. मिश्रणाला हलकी उकळी येऊ द्या.
२. सूपला द्या योग्य घट्टपणा
आता एका छोट्या वाटीत कॉर्नफ्लोअर आणि थंड पाणी एकत्र करून त्याची पातळ पेस्ट तयार करा. मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत, याची काळजी घ्या. ही पेस्ट गरम सूपमध्ये हळूहळू घाला आणि त्याच वेळी चमच्याने सूप ढवळत राहा. यामुळे सूपला योग्य घट्टपणा येईल. हे मिश्रण मंद आचेवर काही वेळ शिजू द्या.
३. तयार करा अंड्याच्या मऊ रिबन्स
एका वेगळ्या वाटीत अंडे फोडून ते व्यवस्थित फेटून घ्या. आता सूपला हलकी उकळी येत असताना चमच्याने सूप गोलाकार पद्धतीने हळू ढवळा. त्यानंतर फेटलेले अंडे सूपमध्ये अतिशय पातळ धारेने हळूहळू सोडा.
असं केल्यामुळे गरम सूपमध्ये अंड्याचे पातळ, मऊ आणि रेशमी धाग्यांसारखे तुकडे तयार होतील. यालाच एग रिबन्स म्हणतात. अंडे घातल्यानंतर सूप जोरात किंवा सतत वेगाने ढवळू नका. त्यामुळे अंड्याच्या रिबन्स तुटू शकतात. अंडे पूर्णपणे शिजेपर्यंत सूप मंद आचेवर ठेवा.
४. गरमागरम सूप सर्व्ह करा
शेवटी सूपची चव पाहून आवश्यकतेनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. गॅस बंद करून सूप एका बाऊलमध्ये काढा. वरून बारीक चिरलेला हिरवा कांदा घालून सजवा. आवडत असल्यास चवीसाठी लिंबाच्या रसाचे काही थेंबही घालू शकता.
सूप बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा
एग ड्रॉप सूपची खरी चव त्याच्या मऊ अंड्याच्या रिबन्समध्ये असते. त्यामुळे अंडे सूपमध्ये एकदम न घालता हळूहळू पातळ धारेने घालणे महत्त्वाचे आहे. तसेच कॉर्नफ्लोअर नेहमी थंड पाण्यात आधी मिसळून घ्यावे, म्हणजे सूपमध्ये गुठळ्या होणार नाहीत. अंडे पूर्णपणे शिजवूनच सूप सर्व्ह करा.
अशा प्रकारे केवळ एका अंड्याचा वापर करून तुम्ही घरच्या घरी चविष्ट एग ड्रॉप सूप तयार करू शकता. कमी साहित्य, सोपी कृती आणि रेस्टॉरंटसारखी चव यामुळे ही रेसिपी नक्कीच करून पाहण्यासारखी आहे.





