निमोणे ग्रामस्थांची संवेदनशीलता: थोरात कुटुंबाला १.३२ लाखांची आर्थिक मदत

निमोणे : शिरूर तालुक्यातील निमोणे येथील हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब रंगनाथ थोरात यांचा ९ जून रोजी करडे (ता. शिरूर) येथे अपघाती मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने थोरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण प्रसंगी निमोणे ग्रामस्थ आणि नातेवाइकांनी थोरात कुटुंबाला धीर देत आर्थिक मदत उभी केली.
निमोणे गावातील काही सोशल मिडिया ग्रुप्सच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. याला उदंड प्रतिसाद देत गावकऱ्यांनी माणुसकी दाखवत ऑनलाइन आणि रोख स्वरूपात १ लाख ३२ हजार ६४० रुपयांची मदत गोळा केली. दशक्रिया विधीच्या वेळी बाळासाहेब यांचे पुत्र चेतन आणि शुभम थोरात तसेच पोपळघट कुटुंबाने ग्रामस्थ आणि नातेवाइकांचे आभार मानले. “तुमच्या साथीने आम्हाला सावरण्याचे बळ मिळेल,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
थोरात कुटुंबाने या मदतनिधीचा गरजेपुरता आणि योग्य वापर करण्याची ग्वाही दिली आहे. ग्रामस्थांच्या या संवेदनशील कृतीमुळे निमोणे गावाच्या सामाजिक एकतेचे दर्शन घडले. ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, संकटकाळात गावकऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





