Stock Market Rise: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी; प्रमुख शेअर्सच्या किंमतींमध्ये मोठी हालचाल
Stock Market Rise:

Stock Market Rise: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत निर्माण झालेली सकारात्मकता आणि जागतिक बाजारपेठेतील मजबूत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी आज वाढ नोंदवत गुंतवणूकदारांना दिलासा दिला, तरीही उच्च स्तरावर गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
सेन्सेक्स २०८.१७ अंकांनी वाढला –
मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स आज २०८.१७ अंकांच्या म्हणजेच ०.२५ टक्क्यांच्या वाढीसह ८४,२७३.९२ वर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ४१७.२ अंकांची उसळी घेत ८४,४८२.९५ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ६७.८५ अंकांनी म्हणजेच ०.२६ टक्क्यांनी वधारून २५,९३५.१५ वर स्थिरावला. व्यवहारादरम्यान निफ्टीने २५,९८९.४५ अंकांपर्यंत मजल मारली होती.
हेही वाचा – बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात 27 आरोपींविरुद्ध ‘मकोका’अंतर्गत आरोप निश्चित
वधारलेले आणि घसरलेले शेअर्स –
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांचा विचार केला असता इटर्नल, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवरग्रिड, टेक महिंद्रा, एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो, टीसीएस, मारुती सुझुकी इंडिया, ॲक्सिस बँक, टायटन आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचे शेअर्स प्रामुख्याने नफ्यात राहिले. याउलट एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स आणि आयटीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.
तज्ज्ञांचे मत –
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी बाजाराच्या स्थितीवर भाष्य करताना सांगितले की, अमेरिका व्यापार करार आणि आशियाई बाजारांतील सकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत बाजाराची घोडदौड सुरू आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा वाढता ओघ आणि रुपयाचे वधारलेले मूल्य यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला आहे. जरी विविध क्षेत्रांमध्ये नफावसुलीचा कल दिसून येत असला, तरी आयात-निर्यात शुल्काबाबतची (Tariff) चिंता आता बऱ्याच अंशी कमी झाली आहे. आगामी काळात बाजाराची दिशा तिसऱ्या तिमाहीच्या आर्थिक निकालांवर अवलंबून असेल, जे आतापर्यंत संमिश्र आणि अपेक्षेपेक्षा काहीसे कमी राहिले आहेत. आता गुंतवणूकदारांचे लक्ष सरकारच्या वित्तीय आणि चलनविषयक उपाययोजनांच्या प्रभावाकडे लागले आहे.
जागतिक बाजाराचा कल –
जागतिक स्तरावर जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा शांघाय कंपोझिट हे सर्व प्रमुख बाजार आज सकारात्मक कल दाखवत बंद झाले. युरोपियन बाजारपेठांमध्येही दुपारच्या सत्रात तेजी होती, तर सोमवारी अमेरिकन बाजार नफ्यात बंद झाले होते. दरम्यान, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी २,२५४.६४ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत ०.२० टक्क्यांची किंचित घट होऊन ते ६८.८९ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. याआधीच्या सत्रात, म्हणजेच सोमवारी सेन्सेक्स ४८५.३५ अंकांनी तर निफ्टी १७३.६० अंकांनी वधारला होता.






