Stock Market: अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे निर्माण झालेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी पडझड पाहायला मिळाली. देशांर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवण्यात आली. केवळ मोठ्या कंपन्यांचे शेअर्सच नव्हे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवरही आज विक्रीचा प्रचंड दबाव दिसून आला. या चौफेर घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात सुमारे २.९९ लाख कोटी रुपयांची घट झाली असून गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. बाजारातील आजच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८५२.४९ अंकांच्या म्हणजेच १.०९ टक्के घसरणीसह ७७,६६४.०० वर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी-५० निर्देशांक २०५.०५ अंकांच्या किंवा ०.८४ टक्के घसरणीसह २४,१७३.०५ वर स्थिरावला. गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले – Stock Market बुधवारी २२ एप्रिल रोजी बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४,६९,३६,८२४.२९ कोटी रुपये होते, जे आजच्या व्यवहारांनंतर ४,६६,३७,२९२.२० कोटी रुपयांवर खाली आले आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात २,९९,५३२.०९ कोटी रुपयांची घट झाली आहे. क्षेत्रनिहाय कामगिरीचा विचार करता, ऑटो, पीएसयू बँक आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांनी बाजारावर सर्वाधिक दबाव निर्माण केला. निफ्टीमधील या क्षेत्रांचे निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक घसरले. आयटी आणि खाजगी बँकांच्या निर्देशांकातही १ टक्क्याहून अधिक घसरण झाली. दुसरीकडे, निफ्टी फार्मा निर्देशांकाने २ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवून बाजार सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. ३० पैकी केवळ ५ शेअर्स वाढीसह बंद – Stock Market सेन्सेक्समधील ३० प्रमुख शेअर्सपैकी केवळ ५ शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये ट्रेंट, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. बीएसईवर आज एकूण ४,४४९ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यामध्ये १,७६२ शेअर्समध्ये वाढ झाली, तर २,५१७ शेअर्स घसरणीसह बंद झाले आणि १७० शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. बाजारात घसरण असूनही १४२ शेअर्सनी आज वर्षभरातील उच्चांकी पातळी गाठली, तर २९ शेअर्स वर्षाच्या निच्चांकी स्तरावर पोहोचले. व्यवहारादरम्यान ९ शेअर्सना अप्पर सर्किट तर ९ शेअर्सना लोअर सर्किट लागले. जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने आगामी काळातही बाजारात चढ-उतार राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बाजार तज्ज्ञांचे मत – अमेरिकन बाँड यिल्डमधील वाढ, रुपयाची कमकुवत स्थिती आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली सातत्यपूर्ण विक्री यामुळे जोखमीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशांतर्गत खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (PMI) वाढीचे संकेत देत असला तरी, उत्पादन खर्चात होणारी वाढ आणि निर्यातीतील नरमाईमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. क्षेत्रांचा विचार करता, फार्मा आणि आरोग्य सेवा यांसारख्या बचावात्मक क्षेत्रांनी या पडझडीत स्वतःला सावरले, मात्र ऑटो, पीएसयू बँक आणि रियल्टी क्षेत्राला मोठा फटका बसला. Stock Market