Stock Market: परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा; वर्षभरात 1.79 लाख कोटींचे शेअर्स विकले
Stock Market:

Stock Market: रुपया कमकुवत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा मारा चालूच आहे. युद्ध आणि इतर कारणामुळे एप्रिल महिन्यात आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी तब्बल 48,213 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे.
गेल्या वर्षाच्या एप्रिलपासून या वर्षाच्या एप्रिलपर्यंत या गुंतवणूकदारांनी 1.79 लाख कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. सरलेल्या वर्षांमध्ये भारतीय रुपयाच्या मूल्यावर दबाव कायम राहिला आहे. विविध देशांदरम्यान युध्द चालू आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह विविध देशात विरोधात व्यापार युद्ध सुरू केलेले आहे. अशा परिस्थितीत भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊन भारतीय रुपयाचे मूल्य या कालावधीत कोसळले आहे.
विशेषतः 28 फेब्रुवारीला अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर रुपयाच्या मूल्यात मोठी घट झाली होती. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदारांना डॉलरमध्ये कमी नफा मिळतो. यामुळे हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करीत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
सुदैवाची बाब म्हणजे गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ आठ टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर महिन्याच्या अखेरीस भारत -अमेरिका व्यापार करार होण्याची शक्यता आहे. जर खरोखरच भारत- अमेरिका व्यापार करार झाला तर मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूकदार पुन्हा भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतात असे समजले जाते.
रुपयाचे मूल्य बर्याच प्रमाणात सुधारल्यानंतर शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 672 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 410 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदार गेल्या एक वर्षापासून निर्देशांकांना आधार देत आहेत. मात्र तरीही शेअर बाजार निर्देशांकानी या वर्षीत नकारात्मक परतावा दिला असल्याचे दिसून येते.
मात्र आता ईराण- अमेरिका संघर्ष संपण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भारत- अमेरिका करार होण्याची ही शक्यता आहे. पुन्हा शेअर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण होईल आणि रुपयाचे मूल्य स्थिर होईल. अशा अवस्थेत परदेशी गुंतवणूकदार पुन्हा भारतात खरेदी करू शकतात.




