Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडली असून, त्यांना मंगळवारी (२८ ऑक्टोबर) जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. छातीत दुखणे आणि अस्वस्थता या तक्रारींमुळे त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. सध्या भुजबळांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली असून, उदावाच्या अँजियोग्राफीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भुजबळ हे महाराष्ट्र राजकारणातील ‘फायरब्रँड’ नेते म्हणून ओळखले जातात. ओबीसी चळवळीतील त्यांच्या धडाकेबाज भाषणांमुळे आणि दीर्घ राजकीय कारकीर्दीमुळे त्यांचा राज्यासह देशव्यापी चाहतावर्ग आहे. आजच त्यांनी मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊन कुंभमेळा तयारीच्या बैठकीत सक्रिय भूमिका बजावली. मात्र, संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून कुंभमेळा बैठकीची माहिती शेअर केल्यानंतरच प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तात्काळ दाखल करण्यात आले.
भुजबळांच्या एक्स पोस्टमध्ये काय?
भुजबळ यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केलेल्या पोस्टमध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावर सविस्तर माहिती दिली. कुंभमेळा मंत्री समितीची बैठक कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून, त्यात नाशिकचा सर्वांगीण विकास, कुशावर्तावरील गर्दीचे नियोजन, कायमस्वरूपी सुविधा, गोदावरीतील सांडपाण्यावर उपाययोजना, सारडा सर्कल ते नाशिक रोड उड्डाणपूल, नाशिक कलाग्राम, भाविकांसाठी पायी चालण्यास कमी अंतर, पोलिस बळकटीकरण, साधूग्राम, विमानतळ विस्तार अशा मुद्द्यांवर चर्चा झाली.
मंत्रिसमितीतील इतर सदस्यांनी जिल्हा रुग्णालय इमारत, ट्राफिक उपाययोजना, मराठी साहित्य संमेलन ब्रँडिंग, उद्योग प्रशिक्षण, तीन टप्प्यात नियोजन, २०० नव्या बस, विशेष सुविधा, सप्तशृंगी गड, तीर्थक्षेत्रे विकास अशा मागण्या मांडल्या. बैठकीत विविध विभागांचे सादरीकरण झाले असून, सर्वांनी नाशिकच्या कुंभमेळ्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लौकिक मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह विविध विभागीय अधिकारी उपस्थित होते.





